6, 6, 6, 6, 6, 6, 6, 6..! आयुष म्हात्रेने 207च्या स्ट्राईक रेटने ठोकलं शतक, 13 चेंडू राखून मिळवला विजय
सय्यद मुश्ताक अली 2025 स्पर्धेत देशांतर्गत टॅलेंटला चालना मिळताना दिसत आहे. या स्पर्धेत आयुष म्हात्रेचा झंझावात पाहायला मिळाला. गेल्या काही सामन्यात त्याची बॅट हवी तशी चालली नव्हती. पण त्याला सूर गवसला असून शतक ठोकलं आहे.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-2026 एलीट ग्रुप ए स्पर्धेत मुंबई आणि विदर्भ यांच्यात सामना झाला. या सामन्यात मुंबईच्या आयुष म्हात्रेचा झंझावात पाहायला मिळाला. मुंबईने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विदर्भने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमवून 192 धावा केल्या. तसेच विजयासाठी 193 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान मुंबईने 3 गडी गमवून 17.5 षटकात पूर्ण केलं. या सामन्यात आयुष म्हात्रेने विदर्भच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. त्याने 53 चेंडूत 8 चौकार आणि 8 षटकार मारत नाबाद 110 धावांची खेळी केली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 207.55 चा होता. अंडर 19 आशिया कप स्पर्धेपूर्वी आयुष म्हात्रेला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत सूर गवसल्याने क्रीडारसिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
विदर्भाचा डाव
विदर्भाने या सामन्यात आक्रमक आणि आश्वासक सुरुवात केली. अथर्व तायडे आणि अमन मोखाडे यांनी पहिल्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी केली. दोघांच्या अर्धशतकी खेळीमुळे मुंबईचा संघ बॅकफूटवर आला होता. अथर्व तायडने 36 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकार मारत 64 धावांवर बाद झाला. तर अमन मोखाडे 30 चेंडूत 7 चौकार आणि 2 चौकारांच्या जोरावर 61 धावा करून बाद झाला. ही जोडी फुटल्यानंतर मात्र विदर्भाची गाडी रुळावरून घसरली. यश राठोडने 23 चेंडूत 23 धावा, तर हर्ष दुबेने 6 चेंडूत 10 धावा केल्या. तर इतर खेळाडूंना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. मुंबईकडून साईराज पाटील आणि शिवम दुबेने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर अथर्व अंकोलकरने 2 आणि शार्दुल ठाकुरने एक विकेट काढली.
Chasing 193 Pressure? What Pressure! 💥🦁 Ayush 🤜🤛Shivam 🥳#WhistlePodu #SMAT pic.twitter.com/8tI4AIPA5K
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 28, 2025
मुंबईचा डाव
मुंबईची सुरुवात काही चांगली झाली नाही. दुसऱ्या षटकात अजिंक्य रहाणे खातं न खोलता तंबूत गेला. त्यानंतर आलेला हार्दिक तामोरेही काही खास करू शकला नाही. त्याने 1 धाव केली आणि बाद झाला. पण एका बाजूने आयुषचा झंझावात सुरुच होता. सूर्यकुमार यादव 30 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकार मारत 35 धावांवर बाद झाला. त्यानंतर शिवम दुबे आणि आयुष म्हात्रे विजयी भागीदारी केली. शिवम दुबेने 19 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकार मारत नाबाद 39 धावा केल्या. विदर्भकडून दर्शन नकलांकडे, पार्थ रेखाडे आणि यश ठाकुर यांनी प्रत्येकी एक विकेट काढली.
