Womens World Cup : दक्षिण अफ्रिकेची अंतिम फेरीत पहिल्यांदाच धडक, इंग्लंडला 125 धावांनी लोळवलं
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण अफ्रिकेने चमकदार कामगिरी केली. इंग्लंडला धावांनी पराभूत अंतिम फेरीत स्थान पक्क केलं आहे. दक्षिण अफ्रिकेने पहिल्यांदा अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे.

वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मोठा उलटफेर झाला आहे. बलाढ्य इंग्लंडचा दक्षिण अफ्रिकेने धावांनी पराभव केला. नाणेफेकीचा कौल हा इंग्लंडच्या बाजूने लागला होता आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. पण हा निर्णय चुकला असंच म्हणावं लागेल. दक्षिण अफ्रिकेची सलामीची फलंदाज आणि कर्णधार लॉरा वॉल्वार्डने जबरदस्त खेळी केली. त्यामुळे इंग्लंडचा संघ पुरता बॅकफूटवर गेला. खर तर 250 धावांच्या आता दक्षिण अफ्रिकेला गुंडाळण्याचा प्रयत्न होता. मात्र हा प्रयत्न फसला. एकट्या लॉरा वॉल्वार्डने 169 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त ताझमिन ब्रिट्सने 45, मराझेन कॅपने 42 आणि क्लो ट्रायनने नाबाद 33 धावांची खेळी केली. यामुळे दक्षिण अफ्रिकेने 50 षटकात 7 गडी गमवून 319 धावांपर्यंत मजल मारली आणि विजयासाठी 320 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 194 धावांवर बाद झाला. हा सामना दक्षिण अफ्रिकेने 125 धावांनी जिंकून अंतिम फेरी गाठली आहे.
इंग्लंडची विजयी धावांचा पाठलाग करताना सुरुवात काही चांगली झाली नाही. आघाडीचे तीन फलंदाज खातं न खोलताच तंबूत गेले. यामुळे इंग्लंडला मोठा फटका सुरुवातीला बसला आणि धावगतीला खिळ बसली. इतकंच काय तर विकेट वाचवण्याची धडपड सुरु झाली. एमी जोन्स, टॅमी ब्यूमोंट आणि हिथर नाइट यांनी खातं खोलता आलं नाही. त्यानंतर कर्णधार नॅट सायव्हर आणि एलिस कॅप्सी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली. नॅट सायव्हर ब्रंट 64 धावांवर बाद झाली नाही आणि इंग्लंडची आशाच संपुष्टात आल्या. एलिस कॅप्सी 50 धावा करून बाद झाली. तर सोफिया डंकले 2 आणि शार्लोट डीनला खातंही खोलता आलं नाही.
दक्षिण अफ्रिकेने वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरी स्थान मिळवलं आहे. आता अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेचा सामना भारत किंवा ऑस्ट्रेलियाशी होईल. भारत ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीचा सामना 30 ऑक्टोबरला नवी मुंबईच्या डीवाय पाटील मैदानात होणार आहे. भारताने हा सामना जिंकला आणि अंतिम फेरी गाठली तर नवा विजेता क्रिकेट विश्वाला मिळेल. आता भारताचा संघ उपांत्य फेरीत कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे.
