‘DRS म्हणजे…’ मोहम्मद सिराजची ती सवय पाहून सुनील गावस्कर यांनी घेतली फिरकी; म्हणाले…
भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेत विकेट मिळवण्यासाठी मोहम्मद सिराजचा संघर्ष सुरु आहे. त्यामुळे मोहम्मद सिराज विकेट मिळवण्यासाठी पंचांच्या निर्णयाला आव्हान देण्यासही मागे पुढे पाहात नाही. असं असताना सुनील गावस्करने त्याच्या डीआरएस अपीलची फिरकी घेत सांगितलं की....

क्रिकेटमध्ये डीआरएस सिस्टम लागू झाल्यापासून पंचांच्या निर्णयाला आव्हान देणं सोपं झालं आहे. मागच्या काही वर्षात डीआरएसचा योग्य वापर होताना दिसत आहे. कधी पंच तर कधी खेळाडू योग्य ठरतात. तिसरे पंच व्हिडीओ रिप्ले, बॉल ट्रॅकर, हॉकआय, हॉटस्पॉट मॅपिंगसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून निर्णयाची शहनिशा करतात. त्यानंतर खेळाडू बाद की नाही हे ठरवतात. भारतीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंह धोनी हा डीआरएस रिव्ह्यू घेण्यात सर्वात तरबेज असल्याचं दिसून आलं आहे. त्याने रिव्ह्यू घेणं म्हणजे तो योग्यच असणार अशी खात्री असते. त्यामुळे डीआरएसचा उल्लेख अनेक जण धोनी रिव्ह्यू सिस्टम असा करतात. पण मोहम्मद सिराजच्या बाबतीत हे चित्र अगदी उलटं आहे. मोहम्मद सिराज आक्रमकपणे पंचांचा निर्णयाला आव्हान देत डीआरएस घेण्यास भाग पाडतो. पण त्याचा निर्णय अनेकदा चुकलेला दिसून येतो. सिराजची ही सवय सुनील गावस्कर यांना माहिती आहे आणि त्यांनी समालोचन करताना त्याची फिरकी घेतली.
सुनील गावस्कर यांनी लीड्सच्या तिसऱ्या दिवशी डीआरएसला एक नवं नाव दिलं. त्यांच्या मते डीआरएसचा अर्थ सिराजसाठी वेगळा आहे. ‘धीरज रखो सिराज’ असा डीआरएसचा फुल फॉर्म त्यांनी सांगितला. कारण लीड्स कसोटी सामन्यात असंच चित्र पाहायला मिळालं. मोहम्मद सिराज अनेकदा डीआरएसची मागणी करताना दिसून आला. यामुळे सुनील गावस्कर यांनी त्याचं असं वागणं पाहून फिरकी घेतली. सुनील गावस्कर यांची टिपणी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दुसरीकडे, भारताचा कसोटी खेळाडू चेतेश्वर पुजारा यानेही मोहम्मद सिराजच्या या सवयीबाबत भाष्य केलं. त्याने सांगितलं की, जेव्हा फलंदाजाचा पॅडला चेंडू आदळतो तेव्हा सिराज कायम तो आऊट असल्याचं वाटतं. दरम्यान, मोहम्मद सिराजला आतापर्यंत फक्त एक विकेट बाद करण्यात यश आलं आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला त्याने तंबूचा रस्ता दाखवला. तर जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या आहेत. दरम्यान इंग्लंडने 400 पार धावा केल्या असून 471 धावा गाठेल अशी स्थिती आहे.
