
आशिया कप स्पर्धेतील सुपर 4 फेरीतील हायव्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत आहे. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेकीदरम्यान पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आघाशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. नाणेफेकीवेळी सामनाधिकारी म्हणून अँडी पायक्रॉफ्टच होते. तसेच संघात दोन बदल केल्याचं देखील जाहीर केलं. सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करू. खेळपट्टी छान दिसतेय आणि काल दव पडला होता. पहिल्या फेरीपासून आपल्याला वाटत होते की आपण बाद फेरीत खेळत आहोत, काहीही बदलले नाही. ती पूर्णपणे वेगळी खेळपट्टी होती. अगदी सामान्य आहे. फक्त दुसरा सामना आहे. या सामन्यात अर्शदीप आणि हर्षित यांना आराम दिला आहे. तर बुमराह आणि वरुण परतले आहेत.’ या सामन्यात विजयी संघाची अंतिम फेरीच्या कूच होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्नशील असतील यात काही शंका नाही. दुसरीकडे, पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने देखील आपलं मत व्यक्त केलं.
सलमान आघा म्हणाला की,’मीही प्रथम गोलंदाजी केली असती. हा एक नवीन सामना आहे, नवीन आव्हान आहे. वातावरण अगदी सामान्य आहे. खेळपट्टी हळू दिसतेय. बॅट आणि बॉल दोन्हीने चांगली सुरुवात करायची आहे. संघात दोन बदल केले आहेत. हसन नवाज आणि खुशदिल शाह खेळत नाहीत.’ दरम्यान, भारताच्या नो हँडशेक प्रकरणानंतर आता पाकिस्तानचा संघ कसा कांगावा करतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, शुबमन गिल, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): सैम अयुब, साहिबजादा फरहान, फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), हुसैन तलत, मोहम्मद हरिस (विकेटकीपर), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद