ICC Ranking : सूर्यकुमार यादव पुन्हा फॉर्मात, आयसीसी क्रमवारीत केली अशी कमाल
ICC T20I Rankings: टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार यादवला पुन्हा एकदा सूर गवसला आहे. गेल्या एक वर्षापासून त्याची कामगिरी सुमार राहिली होती. अखेर न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत पुन्हा कमाल केली. त्याचा फायदा आयसीसी क्रमवारीत झाला आहे.

Suryakumar Yadav T20I Rankings: सूर्यकुमार यादवला टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी सूर गवसल्याने भारतीय क्रीडाप्रेमींचा जीव भांड्यात पडला आहे. कारण गेल्या एक वर्षांपासून मोठी धावसंख्या करण्यासाठी झुंजत होता. पण त्याला काही केल्या यश मिळत नव्हतं. पण टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वीच्या टी20 मालिकेत धावांची लय सापडली. त्याने तीन सामन्यात 171 धावा केल्या आहेत. यात मागच्या दोन सामन्यात त्याने अर्धशतक ठोकलं. विशेष म्हणजे त्याने 171 च्या सरासरीने धावा केल्या. यावेळी सूर्यकुमार यादवचा स्ट्राईक रेट 200 पेक्षा जास्त होता. टी20 मालिकेती तीन सामन्यात त्याने 8 षटकार आणि 19 चौकार मारला आहेत. त्याला या खेळीचा फायदा आयसीसी टी20 क्रमवारीत झाला आहे. त्याने पाच फलंदाजांना धोबीपछाड देत सातवं स्थान गाठलं आहे. मागच्या एक वर्षात सूर्यकुमार यादव टॉप 10 मधून आऊट झाला होता. आता पुन्हा एकदा टॉप 10 मध्ये एन्ट्री झाली आहे.
आयसीसी टी20 क्रमवारीत सूर्यकुमार यादवने ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, टिम सायफर्ट, टिम डेविड आणि डेवाल्ड ब्रेविस यांना मागे टाकलं आहे. सूर्यकुमार यादवच्या क्रमवारीत आणखी सुधारणा होऊ शकते. पण यासाठी त्याला उर्वरित दोन टी20 सामन्यात चांगली कामगिरी करावी लागेल. सूर्यकुमारचा फॉर्म पाहता नक्कीच यात सुधारणा होईल, असं क्रीडाप्रेमी म्हणत आहेत. सूर्यकुमार फलंदाज म्हणून नाही तर कर्णधार म्हणूनही जबरदस्त फॉर्मात आहे. कारण कर्णधारपदाची धुरा हाती घेतल्यापासून त्याने एकही टी20 मालिका गमावलेली नाही. आशिया कप स्पर्धेतही विजय मिळवला आहे. त्याच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघाची विजयी घोडदौड सुरू आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेतही अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.
आयसीसी टी20 क्रमवारीत भारतीयांचा दबदबा
आयसीसी टी20 क्रमवारीत भारतीय खेळाडूंचा वरचष्मा दिसत आहे. आयसीसी फलंदाजांच्या टी20 क्रमवारीत अभिषेक शर्मा पहिल्या स्थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्मा, पाचव्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव आहे. तर गोलंदाजांच्या क्रमवारीत वरुण चक्रवर्ती पहिल्या स्थानावर आहे. जसप्रीत बुमराह 13 व्या स्थानावर पोहोचला आहे. तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत हार्दिक पांड्या तिसऱ्या स्थानावर आहे.
