रोहित शर्मा सारखं मी कोणाला थांबवत नाही..! टी20 मालिकेदरम्यान सूर्यकुमार असं का बोलला?
रोहित शर्माने टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कर्णधारपदाची धुरा सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर पडली आहे. त्याच्या नेतृत्वात टीम इंडिया चांगली कामगिरी करत आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाने 2-0 ने आघाडी घेतली आहे. असं असताना सूर्यकुमार यादवचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे.

इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत टीम इंडियाचं पारडं जड झालं आहे. भारताने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने आपल्या खिशात घातले आहे. यासह मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. आता उर्वरित तीन सामन्यापैकी एका सामन्यात विजय मिळाला की मालिका खिशात जाणार आहे. असं सर्व सकारात्मक वातावरण असताना टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे. रोहित शर्माच्या तुलनेत कर्णधारपद भूषविण्याची पद्धत वेगळी असल्याचं त्याने सांगितलं आहे. रोहित शर्मा सामन्यादरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. अनेकदा तो काय बोलतो हे स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड होतं आणि चर्चेचा विषय ठरतं. रोहित शर्माने गार्डनमध्ये फिरत आहात का? आजही चर्चेत आहे. त्यावर आजही मीम्स तयार केले जात आहे. सूर्यकुमार यादवने यावर आपलं मत स्पष्ट केलं आहे. रोहित शर्माने टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडियाची कमान हाती घेतली आहे. तसेच कर्णधारपद भूषविताना रोहित शर्मा आणि त्याच्यातला फरक सांगितला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेदरम्यान सूर्यकुमार यादवला विचारलं गेलं की, तो खेळाडूंना थांबवतो का? त्यावर सूर्यकुमार यादवने सांगितलं की, रोहित सारखं करत नाही. कारण कोणी गार्डनमध्ये फिरतच नाही. दरम्यान, सूर्यकुमार यादव स्टंप माईकपासून दूर राहणंच पसंत करतो. तसेच एखाद्याची खासियत असेल तर ती त्याच्याकडे राहणं सर्वात चांगलं आहे. सूर्यकुमार यादवने या माध्यमातून सांगितलं की, स्टंप माइक आणि रोहित शर्माची जुगलबंदी आहे तशीच राहिली तर बरं आहे. सूर्यकुमार यादवला रोहित शर्माच्या ये-वो भाषा समजते का? यावरही प्रश्न विचारला गेला. तेव्हा त्याने सांगितलं की, हो. जेव्हा आम्ही गार्डनमध्ये फिरतो तेव्हा आम्हाला ते ऐकायला मिळते.
टी20 संघाचं कर्णधारपद भूषविणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या कर्णधारपदाखाली टीम इंडिया चांगली कामगिरी करत आहे. पण त्याचा फॉर्मची चिंता मात्र क्रीडाप्रेमींना लागून आहे. मागच्या काही सामन्यात सूर्यकुमार यादवची बॅट हवी तशी तळपलेली नाही. त्यामुळे त्याच्यावर कर्णधारपदाचं दडपण आहे का? असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारत आहेत. आता तिसरा टी20 सामना राजकोटमध्ये होणार आहे. या सामन्यात चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.
