IND vs PAK : भारत पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! असं काही झालं तर पुढचा प्रवास कठीण
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत मोठे उलटफेर पाहायला मिळत आहेत. खेळपट्टीचा अंदाज येत नसल्याने मोठ्या संघांची गोची झाली आहे. प्रथम फलंदाजी घेतली काय आणि गोलंदाजी घेतली काय? कधी काय होईल सांगता येत नाही. अशात दिग्गज संघाचा पुढचा मार्ग कठीण होताना दिसत आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाच-पाच संघांचे एकूण 4 गट पाडले गेले आहेत. अ गटात भारतासोबत अमेरिका, पाकिस्तान, कॅनडा आणि आयर्लंड हे संघ आहेत. आतापर्यंत साखळी फेरीची लढत रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. कोणलाही वाटलं नव्हतं असा उलटफेरत भारत असलेल्या गटात झाला आहे. पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळत असलेल्या अमेरिकेने आपला रंग दाखवून दिला आहे. जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या पाकिस्तान संघाला पराभवाची धूळ चारली आहे. सुपर ओव्हरमध्येही पाकिस्तानला डोकं वर काढू दिलं नाही. त्यामुळे भारत असलेल्या गटात मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे, हे जवळपास निश्चित झालं आहे. कारण पाकिस्तानच्या पराभवाने टॉप दोन संघांचं गणित बदललं आहे. साखळी फेरीत प्रत्येक संघाला एकूण चार सामने खेळायचे आहेत. त्यापैकी तीन सामन्यात विजय मिळवला की सुपर 8 फेरीचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे पाकिस्तानसही भारताची धडधड वाढली आहे. भारत पाकिस्तान सामन्यातील जय पराजय बरंच काही घडवून आणणार आहे.
अमेरिकेने पहिल्या सामन्यात कॅनडा आणि दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केलं आहे. त्यामुळे आणखी एक विजय मिळवताच सुपर 8 फेरीचा मार्ग मोकळा होणार आहे. अमेरिकेचा पुढचे सामने भारत आणि आयर्लंडसोबत आहेत. आयर्लंडविरुद्ध अमेरिका सहज जिंकेल असा क्रीडाप्रेमींचा अंदाज आहे. त्यामुळे अमेरिकेचं सुपर 8 फेरीचं तिकीट पक्कं होईल. मात्र भारत आणि पाकिस्तानची पुढची वाट कठीण होईल. त्यामुळे भारत पाकिस्तान सामन्याच्या निकालावर दोन्ही संघांचं भविष्य अवलंबून आहे. हा सामना भारतानं जिंकल्यास पुढचं गणित सोपं होईल.
भारताविरुद्धचा सामना पाकिस्तानने गमवला तर मात्र सुपर 8 फेरीचं स्वप्न लांबणार आहे. मग सर्वकाही जर तर वर अवलंबून राहावं लागेल. अमेरिकेला भारत आणि आयर्लंडविरुद्धचा सामना काहीही करून गमवावा लागेल. तसेच पाकिस्तानला कॅनडा आणि आयर्लंडविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. तर पाकिस्तानचं सुपर 8 फेरीचं काय ते ठरेल.
पाकिस्तान विरुद्धचा सामना भारताने गमावला तर मात्र तसंच काहीसं चित्र होणार आहे. पाकिस्तान आणि अमेरिकेच्या कामगिरीवर लक्ष ठेवावं लागेल. इतकंच काय तर उर्वरित दोन्ही सामने काहीही करून मोठ्या फरकाने जिंकून नेट रनरेट चांगला ठेवावा लागेल. अन्यथा भारताचं सुपर 8 फेरीच्या स्वप्नांना सुरुंग लागू शकतो. कारण वर मांडलेलं गणित खरं ठरलं तर तिन्ही संघांचे प्रत्येकी 6 गुण होतील. अशावेळी नेट रनरेट असलेल्या संघांना पुढचं तिकीट मिळेल. त्या तुलनेत आयर्लंडविरुद्ध भारताने चांगली कामगिरी केल्याने धावगती चांगली आहे.
