IND vs PAK : टीम इंडियाचा दुसऱ्या सामन्यातही गेम फसला, पाकिस्तानविरुद्ध तीच चूक
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे मधल्या फळीतील फलंदाजांवर दबाव वाढल्याचं दिसून येत आहे. इतकंच काय तर अक्षर पटेलला तिसऱ्या क्रमांकावर उतरवण्याची वेळ आली.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या हायव्होल्टेज सामन्यात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली स्वस्तात बाद झाले. हे दोन्ही फलंदाज आयपीएल स्पर्धेत चमकले होते. त्यामुळे या दोघांनी टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ओपनिंग करावी अशी अनेकांची मागणी होती. त्याप्रमाणे या वर्ल्डकप स्पर्धेत प्रयोग करण्यात आला. विराट कोहली आणि रोहित शर्मा आघाडीला फलंदाजीसाठी आले. मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्मा आणि आरसीबीसाठी विराट कोहली ओपनिंगला येत होते. त्याचप्रमाणे ही जोडी टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ओपनिंगला आली. पण आयर्लंडनंतर ही जोडी पाकिस्तानविरुद्धही फेल गेली. विराट कोहली आणि रोहित शर्मा काही खास सुरुवात करून देऊ शकले नाहीत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने दुसरं षटक नसीम खानच्या हाती सोपवलं. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विराट कोहलीने चौकार मारला. दुसरा चेंडू निर्धाव गेला आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट देऊन बसला. आयर्लंडविरुद्धही एक धाव करून बाद झाला होता.
विराट कोहलीची विकेट जाताच डावखुरा फलंदाज म्हणून ऋषभ पंत मैदानात उतरला. त्यानंतर रोहित शर्मा दुसऱ्या बाजूने डाव सावरेल अशी अपेक्षा होती. मात्र शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारताना फसला आणि झेल बाद झाला. त्यानंतर टीम इंडियावरील दडपण पाहता डावखुऱ्या अक्षर पटेलला वर पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विराट कोहलीला ओपनिंगला पाठवण्याचा निर्णय चुकल्याचा नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. आघाडीचे दोन्ही फलंदाज झटपट बाद झाल्याने संघावरील दडपण वाढलं असल्याचं मत अनेकांनी मांडलं आहे. टीम इंडियावर आता मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान आहे. तरच टीम इंडियाचं विजयाचं गणित सुटू शकतं.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): मोहम्मद रिझवान, बाबर आझम (कर्णधार), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद अमीर.
