Asia Cup 2025 आधी टीम इंडियासाठी गूड न्यूज, विस्फोटक फलंदाजाचं होणार कमबॅक! कोण आहे तो?
Indian Cricket Team : आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या एका खेळाडूबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. जाणून घ्या तो खेळाडू कोण आहे.

टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज श्रेयस अय्यर सध्या क्रिकेटपासून दूर आहे. श्रेयस अय्यर याने त्याच्या नेतृत्वात पंजाब किंग्स संघाला आयपीएलच्या 18 व्या मोसमात (IPL 2025) अंतिम फेरीपर्यंत पोहचवलं होतं. त्यानंतर श्रेयस क्रिकेटपासून दूर आहे. श्रेयसची इंग्लंड दौऱ्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली नाही. मात्र आता भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. श्रेयस अय्यर क्रिकेटच्या मैदानात उतरण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. श्रेयसने तो देशांतर्गत स्पर्धेतील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी उपलब्ध असल्याचं सांगितलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रेयस अय्यर याच्यासह सरफराज खान हा देखील दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी उपलब्ध आहे.
श्रेयससोबत कोण कोण खेळणार?
श्रेयस व्यतिरिक्त सर्फराज खान, शिवम दुबे आणि तुषार देशपांडे हे तिघेही या स्पर्धेत खेळण्यासाठी इच्छूक आहेत. अय्यरचा वेस्ट झोनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. वेस्ट झोनने आधीच उपांत्य फेरीत धडक दिली आहे. वेस्ट झोनचा पुढील सामना हा 4 सप्टेंबरला होणार आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी संधी नाही
इंग्लंड दौऱ्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रेयस अय्यर याला भारतीय संघात संधी दिली जाईल, अशी शक्यता होती. मात्र निवड समितीने श्रेयसवर विश्वास दाखवला नाही. निवड समितीने श्रेयस व्यतिरिक्त आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंना संधी देण्यात आली. श्रेयसने आतापर्यंत भारताचं 14 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. श्रेयसने या दरम्यान 1 शतक आणि 14 अर्धशतकं झळकावली आहेत.
श्रेयसला अनेक महिन्यांपूर्वी बीसीसीआयने वार्षिक करारातून वगळलं होतं. मात्र तिथून श्रेयसने कडक कमबॅक केलं. श्रेयसने त्याच्या नेतृत्वात देशातंर्गत क्रिकेट स्पर्धेत आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिलं. श्रेयसने या स्पर्धांमध्ये फलंदाज म्हणूनही आपली छाप सोडली. मात्र अजित आगरकर यांच्या नेतृत्वातील निवड समितीकडून श्रेयसला संधी मिळालीच नाही. त्यामुळे आता श्रेयसला आयपीएल 2025 मधील कामगिरीच्या जोरावर आगामी आशिया कप स्पर्धेसाठी संधी मिळेल, अशी आशा आहे. त्यामुळे निवड समिती या स्पर्धेसाठी तरी श्रेयसवर विश्वास दाखवणार का? हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.
