Rohit Sharma : रोहित शर्मा निवृत्तीनंतर भावूक, पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाला..
Rohit Sharma 1st Reaction After Test Retirement : रोहित शर्मा याने भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदासह खेळाडू म्हणूनही निवृत्ती घेतली. रोहितने त्यानंतर पहिल्या प्रतिक्रिया देताना काय म्हटलं? जाणून घ्या.

भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार, अनुभवी फलंदाज आणि युवा क्रिकेटपटूंचा मोठा भाऊ असलेल्या रोहित शर्मा याने बुधवारी 7 मे रोजी निवृत्ती घेत चाहत्यांना मोठा धक्का दिला. रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्याआधी निवृत्तीबाबत निर्णय घेतला. रोहितला इंग्लंड दौऱ्याआधी कर्णधारपदावरुन हटवण्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु होती. रोहितने या चर्चेदरम्यान थेट कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. रोहितने सोशल मीडियावरुन निवृत्तीची माहिती दिली. तसेच रोहितने निवृत्तीनंतर याच सोशल मीडिया पोस्टमधून पहिली प्रतिक्रियाही दिली.
रोहित शर्माची निवृत्तीनंतर पहिली प्रतिक्रिया
रोहित शर्मा त्याच्या तोडफोड खेळीमुळे ‘हिटमॅन’ या नावानेही ओळखला जातो. हिटमॅनने इंस्टा स्टोरीतून निवृत्तीची माहिती दिली. रोहितने या इंस्टा स्टोरीत टीम इंडियाच्या टोपीचा फोटोसह मेसेज शेअर केला आणि निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. “मी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे”, असं रोहितने चाहत्यांना कळवलं.
“मला कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. इतके वर्ष तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी मी आभारी आहे. मी टीम इंडियासाठी एकदिवसीय क्रिकेट खेळणार”, असं म्हणत रोहितने चाहत्यांचे आभार मानले आणि वनडेत खेळत राहणार असल्याचं स्पष्ट केलं.
रोहितची धावांसाठी ‘कसोटी’
रोहितला गेल्या काही महिन्यांमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये धावांसाठी संघर्ष करावा लागला. रोहित बॉर्डर गावसकर ट्रॉफीत अपयशी ठरला. रोहित या मालिकेतील 5 पैकी 3 सामने खेळला. रोहितला या 3 सामन्यांमध्ये फक्त 31 धावाच करता आल्या. त्यामुळे रोहितवर टीका करण्यात आली. इतकंच काय तर रोहितला प्लेइंग ईलेव्हनमध्येही घेऊ नये, असंही म्हटलं जात होतं.
रोहित शर्माचं टेस्ट करियर
रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा सर्वात यशस्वी सलामीवीर फलंदांजापैकी एक होता. रोहितने टीम इंडियासाठी एकूण 67 कसोटी सामन खेळले. रोहितने या 67 कसोटी सामन्यांमध्ये 40.57 च्या सरासरीने 4 हजार 301 धावा केल्या. रोहितचा कसोटी क्रिकेटमधील 212 रन्स हा हायस्कोर होता. तसेच रोहितने 12 शतकं आणि 18 अर्धशतकंही झळकावली होती. रोहितच्या निवृत्तींनतर आता शुबमन गिल याचं नाव कर्णधारपदासाठी आघाडीवर आहे. तसेच जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत या 2 नावांचीही चर्चा आहे.
