Rohit Sharma Retirement : रोहित शर्मा याची कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती, टीम इंडियाला मोठा धक्का
Rohit Sharma Test Cricket Retirement : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने आयपीएलच्या 18 व्या मोसमादरम्यान मोठा निर्णय घेत क्रिकेट चाहत्यांना झटका दिला आहे. रोहितने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे.

या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याने टी 20Iनंतर कसोटी क्रिकेटमधूनही तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. रोहित शर्मा याने सोशल मीडियावरुन इंस्टा स्टोरी पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. रोहितने एकाएकी घेतलेल्या या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना मोठा झटका लागला आहे. रोहितने निवृत्ती जाहीर करण्याआधी त्याला कसोटी संघाच्या कर्णधारपदावरुन हटवण्याची चर्चा सुरु होती. रोहितने या दरम्यानच निवृत्त होत असल्याचा बॉम्ब टाकला आणि विषय संपवला.
रोहितने इंस्टा स्टोरीत काय म्हटलं?
“रोहित शर्माने इंस्टा स्टोरीत त्याच्या 280 क्रमांकाच्या टोपीचा फोटो पोस्ट केला आहे. मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. भारतीय संघाचं कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणं ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मी तुमच्या प्रेमासाठी आणि पाठींब्यासाठी आभारी आहे”, असं रोहितने या इंस्टा स्टोरीत नमूद केलंय.
रोहित शर्माची कसोटी कारकीर्द
रोहित शर्मा याने 6 नोव्हेंबर 2013 रोजी कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. रोहितने तेव्हापासून गेली 12 कसोटी संघांचं प्रतिनिधित्व केलं. तसेच रोहितने या दरम्यान काही वर्ष भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली. रोहितने 67 कसोटी सामन्यांमधील 116 डावांमध्ये 57.08 या स्ट्राईक रेटने आणि 40.58 च्या सरासरीने 4 हजार 302 धावा केल्या आहेत. रोहितने या दरम्यान 88 षटकार आणि 473 चौकार लगावले. रोहितने 12 वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत 18 अर्धशतकं, 12 शतकं आणि 1 द्विशतक झळकावलं होतं. रोहितची 212 ही कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या होती.
रोहितची कसोटी कर्णधार म्हणून कामगिरी
रोहितने 2022-2024 दरम्यान एकूण 24 सामन्यांमध्ये भारतीय कसोटी संघाचं नेतृत्व केलं. रोहितने टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात 24 पैकी 12 सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला. तर 9 वेळा पराभवाचा सामना करावा लागला. तर 3 सामने अनिर्णित राहिले. रोहितची कर्णधार म्हणून 57.14 अशी विजयी टक्केवारी राहिली.
हिटमॅनचा कसोटी क्रिकेटला अलविदा
🚨 ROHIT SHARMA RETIRED FROM TEST CRICKET 🚨 pic.twitter.com/Yjtz8onaOr
— Johns. (@CricCrazyJohns) May 7, 2025
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचं उपविजेतेपद
रोहितने टीम इंडियाला त्याच्या नेतृत्वात 2021-2023 या वर्ल्ड टेस्ट चॅम्पनशीप स्पर्धेचं उपविजेतेपद मिळवून दिलं होतं. भारताला या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं. त्यामुळे भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं.
