Ravi Shastri : …तर रोहित-विराटसोबत पंगा घेणारे बाजूला होतील, रवी शास्त्रींचा ‘गंभीर’ इशारा!
Ravi Shastri on Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मा या जोडीच्या भविष्यावरुन प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना रवी शास्त्री यांनी चांगल्याच भाषेत सुनावलं आहे. जाणून घ्या माजी प्रशिक्षक काय म्हणाले.

रोहित शर्मा आणि विराट कोहली ही टीम इंडियाची अनुभवी जोडी त्यांच्या कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. या दोघांनी गेल्या महिन्याभरात सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. दोघेही आता फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळत आहेत. येत्या 2027 मध्ये वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. रोहित आणि विराट या स्पर्धेत खेळणार की नाहीत? हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. भारताला 2023 मध्ये वनडे वर्ल्ड कप ट्रॉफीने हुलकावणी दिली होती. भारताला रोहितच्या नेतृत्वात उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. त्यामुळे रोहित आणि विराटने भारताला वनडे वर्ल्ड कप जिंकून द्यावा, अशी आशा चाहत्यांची आहे. मात्र तोवर ही जोडी खेळणार की निवृत्त होणार? याबाबत काहीही निश्चित नाही.
रोहित आणि विराट या दोघांच्या वयाच्या मुद्द्यावरुन त्यांच्या संघातील स्थानावरूनही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी वयाचा मुद्दा उपस्थित करणाऱ्यांना कडक शब्दात सुनावलं आहे. विराट आणि रोहितसारख्या खेळाडूंसोबत पंगा घेणं बरोबर नसल्याचं शास्त्री यांनी म्हटलंय.
रवी शास्त्री काय म्हणाले?
“विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही एकदिवसीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आहेत. यांच्यासोबत तुम्ही पंगा घ्यायला नको”, असं शास्त्री यांनी म्हटलं. शास्त्री यांनी प्रभात खबरला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केलं.
विराट आणि रोहितच्या भविष्याबाबत असे प्रश्न उपस्थित होण्यामागे कारणीभूत कोण आहे? असा प्रश्न शास्त्री यांना विचारण्यात आला. यावर शास्त्रींनी रोखठोक प्रतिक्रिया दिली.
शास्त्रींनी विचारलेल्या प्रश्नावर व्यक्त होताना कुणाचं नाव घेतलं नाही. मात्र त्यांनी थेटच म्हटलं. “काही माणसं असं करत आहेत. मी इतकंच सांगतो की, हे दोघे जर टिकले, तसेच सर्व योग्य पद्धतीने झालं तर, त्यांच्यासोबत पंगे घेणारे इथून गायब होतील”, असं शास्त्री यांनी म्हटलं.
“अशा खेळाडूंसोबत मस्ती करु नका. मस्ती करणारे करत आहे. त्यांचं डोकं ठीक झालं आणि सर्व काही योग्य झालं तर सर्व बाजूला होतील”, असं शास्त्रींनी ठणकावून सांगितलं.
रोहित-विराटचा तडाखा
दरम्यान रोहित आणि विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेची दणक्यात सुरुवात केली. विराटने पहिल्या दोन्ही सामन्यात शतक झळकावलं. तर रोहितने पहिल्या सामन्यात अर्धशतक केलं होतं. तर त्याआधी रोहितने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील शेवटच्या सामन्यात शतक ठोकलं होतं.
