Asia Cup 2025 : आशिया कपआधी टीम इंडियाची सर्वात मोठी कसोटी; खेळाडूंचा कस लागणार!
Indian Cricket Team : आशिया कप 2025 स्पर्धेआधी टीम इंडियाच्या खेळाडूंचा चांगलाच कस लागणार आहे. भारतीय संघातील खेळाडूंना फिटनेस सिद्ध करण्यासाठी ब्रोंको टेस्टला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.

आशिया कप 2025 स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. या बहुप्रतिक्षित स्पर्धेचा 9 सप्टेंबरपासून श्रीगणेशा होणार आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच 6 ऐवजी 8 संघ सहभागी होणार आहेत. यूएईकडे या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे. या स्पर्धेत 9 ते 28 सप्टेंबरदरम्यान एकूण 8 संघात 19 सामने होणार आहेत. आगामी टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया कप स्पर्धा टी 20 फॉर्मेटने होणार आहे. गतविजेता भारतीय संघ या स्पर्धेत सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात खेळणार आहे. सूर्यासाठी टी 20i कॅप्टन म्हणून ही पहिली आणि सर्वात मोठी स्पर्धा असणार आहे. त्यामुळे सूर्यासमोर या मालिकेत कॅप्टन म्हणून आपला ट्रॅक रेकॉर्ड कायम ठेवण्याचं आव्हान असणार आहे.
भारतीय संघ या स्पर्धेतील आपला पहिला सामना 10 सप्टेंबरला यूएई विरुद्ध खेळणार आहे. त्याआधी मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय संघातील खेळाडूंना दुबईत एका टेस्टला सामोरं जावं लागू शकतं. बीसीसीआयने खेळाडूंची फिटनेस लक्षात घेत या टेस्टचा समावेश केला आहे.
दुबईत टेस्ट होण्याची शक्यता!
बीसीसीआयकडून भारतीय खेळाडूंची फिटनेस तपासण्याठी योयोनंतर ब्रोंको टेस्टची अंमलबजावणी करण्यात आली आहे. याआधी फक्त यो-यो टेस्ट केली जायची. मात्र आता खेळाडूंना ब्रोंको टेस्टसद्वारे फिटनेस सिद्ध करावी लागणार आहे. टीम इंडियाचे स्ट्रेंथ आणि कंडीशनिंग कोच एड्रीयन ले रॉक्स यांनी योयोसह ब्रोंको टेस्ट घेण्यात यावी, अशी शिफारिश केली होती. अवघ्या काही दिवसांपूर्वी रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकुर, प्रसिध कृष्णा आणि शुबमन गिल हे खेळाडू बंगळुरुतील सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये फिटनेस टेस्टसाठी गेले होते. मात्र मीडिया रिपोर्टनुसार, या खेळाडूंची ब्रोंको टेस्ट करण्यात आली नाही.
आशिया कप स्पर्धेसाठी बीसीसीआय निवड समितीने मुख्य संघात 15 खेळाडूंचा समावेश केला आहे. रिपोर्ट्सनुसार, या स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेल्या खेळाडूंची दुबईत ब्रोंको टेस्ट केली जाऊ शकते.
टीम इंडिया 4 सप्टेंबरला यूएईला रवाना होणार आहे. तर 5 सप्टेंबरला भारतीय संघ दुबईतील आयसीसी अकॅडेमीत सराव सत्रात सहभागी होणार आहे. तेव्हाच खेळाडूंची फिटनेस टेस्ट होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
ब्रोंको टेस्ट कशी होणार?
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रोंको टेस्टची 20 मीटर शटल रनिंगने सुरुवात होईल. त्यानंतर यात वाढ होत शटल रनिंगमध्ये खेळाडूला 40 आणि 60 मीटर धावावं लागेल, अशाप्रकारे 1 सेट पूर्ण होईल. खेळाडूंना अशा 5 सेट न थांबता ही टेस्ट द्यावी लागणार आहेत. त्यामुळे या ब्रोंको टेस्टमध्ये खेळाडूंच्या फिटनेसचा चांगलाच कस लागणार आहे. मात्र ही टेस्ट होणार की नाही? याकडेही खेळाडूंचं अधिक लक्ष असणार आहे.
