Captain : टीम इंडियाच्या कॅप्टन अडचणीत, इंग्लंडमध्ये शस्त्रक्रिया होणार! 2 महिने क्रिकेटला मुकणार?
Team India Captain : इंग्लंडमधून टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या कर्णधाराला पुढील काही महिने क्रिकेटपासून दूर रहावं लागणार आहे. कर्णधारावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

आर अश्विन, रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी त्रिकुटाच्या कसोटी निवृत्तीनंतर आता टेस्ट टीम इंडियात अपवाद वगळता युवा खेळाडू खेळताना दिसणार आहेत. टीम इंडियाच्या शुबमन पर्वाला इंग्लंड दौर्यातून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया शुबमन गिल याच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होत आहे. टीम इंडियाची या सलामीच्या सामन्यासाठी तयारी झाली आहे. टीम इंडिया जुलै महिन्यात बांगलादेश दौरा करणार आहे. टीम इंडियाला या दौऱ्यात 3 वनडे आणि 3 टी 20i सामन्यांची मालिका खेळायची आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या कर्णधारावर इंग्लंडमध्ये शस्त्रक्रिया होणार आहे.
इंग्लंडमध्ये होणार शस्त्रक्रिया
टी 20i टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूर्या स्पोर्ट्स हर्नियाने त्रस्त आहे. या स्पोर्ट्स हर्नियावर उपचारासाठी सूर्या लंडनमध्ये आहे. सूर्याला यामुळे बांगलादेश विरूद्धच्या टी 20i मालिकेला मुकावं लागू शकतं. सूर्यावर शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्याला कमबॅक करण्यासाठी किमान 2 महिन्यांचा वेळ लागू शकतो. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.
आयपीएल 2025 मध्ये चमकदार कामगिरी
सूर्यकुमारने काही दिवसांपूर्वी झालेल्या आयपीएल स्पर्धेतील 18 मोसमात मुंबई इंडियन्ससाठी चमकदार कामगिरी केली होती. सूर्याने मुंबईला क्वालिफायर 2 पर्यंत पोहचवण्यात बॅटिंगने प्रमुख भूमिका बजावली होती. सूर्याने या हंगामात मुंबईसाठी सर्वाधिक धावा केल्या. सूर्याने एकूण 16 सामन्यांमध्ये 717 धावा केल्या. सूर्याने या दरम्यान 5 अर्धशतकं झळकावली होती. सूर्या त्याच्या या तोडू खेळीमुळेच कमी काळात टीम इंडियात आपलं स्थान निश्चित केलं. तसेच सूर्या त्याच्या या कामगिरीमुळे संघात अनुभवी खेळाडू असूनही कॅप्टन्सी मिळवण्यात यशस्वी ठरला. मात्र आता सूर्याच्या मेडीकल अपडेटमुळे टीम मॅनजमेंटचं टेन्शन वाढलं आहे. मात्र बीसीसीआयकडून सूर्याबाबत कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही.
दरम्यान सूर्यावर याआधी अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तसेच सूर्याला दुखापतीचा सामना करावा लागला आहे. सूर्याला गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी घोट्याला दुखापत झाली होती. तसेच स्पोर्ट्स हर्नियाच्या त्रासाचा सामना करावा लागला होता. सूर्यावर तेव्हा जर्मनीत शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र सूर्याने काही आठवड्यातच कमबॅक केलं होतं. सूर्या टीम इंडियाच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. तसेच सूर्या लीडर ग्रुपचा भाग आहे. त्यामुळे सूर्याचं फिट राहणं टीम इंडियासाठी महत्त्वाचं आहे.
सूर्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
दरम्यान सूर्याने आतापर्यंत टीम इंडियाचं 1 कसोटी, 37 एकदिवसीय आणि 83 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र सूर्या पूर्णवेळ टी 20i मध्ये खेळतो. सूर्याने आतापर्यंत टी 20i मध्ये 2 हजार 598, वनडेत 773 तर कसोटीत 8 धावा केल्या आहेत.
