वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या टॉप 4 साठी अतितटीची लढाई सुरु, एका सामन्याने भारताचं समीकरण बदललं
वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेतील 4 सामन्यांचा खेळ संपला आहे. म्हणजे स्पर्धेत भाग घेतलेल्या आठ संघांनी प्रत्येकी एक सामना खेळला आहे. त्यामुळे आता टॉप 4 ची लढाई खऱ्या अर्थाने सुरु झाली आहे.

वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धा आता प्रत्येक सामन्यानंतर रंगतदार वळणावर येणार आहे. या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी झाले असून रॉबिन राउंड पद्धतीने सामने होत आहे. म्हणजे प्रत्येक संघाला 7 सामने खेळायचे आहेत. यानुसार गुणतालिकेत टॉप 4 संघांना उपांत्य फेरीत खेळण्याची संधी मिळणार आहे. आता या स्पर्धेतील 4 सामने पार पडले असून प्रत्येक संघाने 1 सामना खेळला आहे. यात चार संघांना विजय, तर चार संघांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. पहिल्या फेरीचा टप्पा पार पडला असून टॉप फेरीची शर्यत सुरु झाली आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश आणि भारताने या स्पर्धेतील पहिला सामना जिंकला आहे. तर श्रीलंका, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिकेने पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. पहिल्या फेरीत नेट रनरेटचं गणित महत्त्वाचं ठरलं आहे.
इंग्लंडने पहिल्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा दारूण पराभव केल्याने 2 गुणांची कमाई झाली आहे. तसेच नेट रनरेट हा +3.773 इतका आहे. त्यामुळे पहिल्या स्थानावर विराजमान आहे. इंग्लंडने या सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा दारूण पराभव केल्याने फायदा झाला. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया असून त्यांनी न्यूझीलंडचा पराभव केला. त्यांचा 2 गुणांसह नेट रनरेट हा +1.780 इतका आहे. बांगलादेशने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत गुण कमावले. तसेच नेट रनरेट हा +1.623 आहे. तर चौथ्या क्रमांकावर टीम इंडिया आहे. भारताने श्रीलंकेचा पराभत करत 2 गुणांची कमाई केली असून नेट रनरेट हा +1.255 इतका आहे. त्यामुळे दुसर्या फेरीत आता टॉप 4 लढाई चुरशीची होणार आहे.
4 ऑक्टोबरला श्रीलंकेचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. 5 ऑक्टोबरला भारताचा सामना पाकिस्तानशी, 6 ऑक्टोबरला न्यूझीलंडचा सामना दक्षिण अफ्रिकेशी, तर 7 ऑक्टोबरला इंग्लंडचा सामना बांगलादेशशी होणार आहे. या चार सामन्यातील प्रत्येक सामन्याच्या निकालानंतर गुणतालिकेत उलथापालथ होणार आहे. नुसता सामना जिंकून चालणार नाही तर नेट रनरेटही चांगला ठेवावा लागणार आहे. त्यामुळे टॉप 4 मध्ये कोण जागा कायम ठेवतं? आणि कोण पुढे जातं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
