IND vs NZ : तिलक वर्मा दुखापतीमुळे पहिल्या 3 टी 20I सामन्यांतून बाहेर, भारताला मोठा झटका
India vs New Zealand T20i Series 2026 : भारतात टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. त्याआधी टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध शेवटची टी 20I मालिका खेळणार आहे. मात्र लक वर्मा याला मालिकेतील पहिल्या 3 सामन्यांना दुखापतीमुळे मुकावं लागलं आहे.

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात (India vs New Zealand) एकदिवसीय आणि टी 20I मालिका खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात ही एकदिवसीय मालिकेने होणार आहे. उभयसंघातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर 21 जानेवारीपासून टी 20I मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेत एकूण 5 सामने खेळवण्यात येणार आहेत. भारताची आगामी टी 20I वर्ल्ड कपआधीची ही शेवटची मालिका असणार आहे. त्यामुळे भारतासाठी ही मालिका फार महत्त्वाची आहे. मात्र त्याआधी भारताला मोठा झटका लागला आहे. भारताच्या मॅचविनर आणि युवा फलंदाजाला दुखापतीमुळे न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20I मालिकेतील (India vs New Zealand T20I Series 2026) काही सामन्यांत खेळता येणार नाही. याबाबतची माहिती बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
भारताचा मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज तिलक वर्मा (Tilak Varma Injury) याला दुखापतीमुळे न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या 3 टी 20I सामन्यात खेळता येणार नाही. तिलक पहिल्या 3 सामन्यांतून बाहेर झाला आहे. तर उर्वरित 2 सामन्यांत खेळणार की नाही? हे त्याच्या तब्येतीतील सुधारावर अवलंबून असेल, असं बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
तिलकला काय झालं?
टीम इंडियाच्या डावखुऱ्या फलंदाजाला विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत हैदराबादकडून खेळताना राजकोट विरूद्धच्या सामन्यात तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यामुळे तिलकला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिलकवर 7 जानेवारी रोजी तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. तिलकला गुरुवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तिलकची प्रकृती सध्या स्थिर आहे. तो शुक्रवारी हैदराबादला परतरणार आहे.
तिलकच्या जागी कुणाला संधी?
तिलकच्या जागी भारतीय संघात पहिल्या 3 सामन्यांसाठी कुणाला संधी दिलीय? याची उत्सूकता चाहत्यांना आहे. मात्र बीसीसीआयकडून तिलकच्या जागी बदली खेळाडूचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही.
भारताला मोठा झटका
🚨 NEWS 🚨
Tilak Varma ruled out of the first three T20Is against New Zealand.
His availability for the remaining two matches will be assessed based on his progress during the return-to-training and skill phases.
Details 🔽 | #TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank…
— BCCI (@BCCI) January 8, 2026
तिलक भारताचा प्रमुख फलंदाज
दरम्यान तिलक अवघ्या वर्षात भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज झाला. तिलकने टी 20i संघातील स्थान कायम केलं आहे. तिलकने गेल्या वर्षी झालेल्या आशिया कप 2025 स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केली. तिलकने या स्पर्धेतील अंतिम सामन्यात पाकिस्तान विरुद्ध नाबाद 69 धावांची खेळी केली होती.
