अभिषेक शर्माला बाद करताच UAE चा गोलंदाज भिडला, पण वैभव सूर्यवंशीने त्याच गोलंदाजाची अशी धुलाई केली की मैदानावरच उतरली मस्ती!
Abhishek Sharma And Ibrar Shah Ahmed Fight: युएईचा गोलंदाज इब्रार अहमद आणि अभिषेक शर्मा यांच्यात वाद झाला. ज्यामुळे खेळपट्टीवर बाचाबाची झाली. अभिषेक बाद झाल्याचा बदला वैभवने त्याच गोलंदाजावर घेतला.

आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 च्या गट फेरीतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात युएईविरुद्ध 250 धावांचे लक्ष्य गाठताना, भारत ‘अ’ संघाचा सलामीवीर अभिषेक शर्माच्या विकेटवरून बराच नाट्यमय प्रसंग घडला. या सामन्यात युएईने केलेल्या 249/8 धावांना प्रत्युत्तर देताना अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांनी आक्रमक सुरुवात केली.
चौथ्या षटकात अभिषेकने युएईचा गोलंदाज इब्रार शाह अहमदच्या पहिल्या दोन चेंडूंवर एक चौकार आणि एक षटकार मारून आपला आक्रमकपणा दाखवला. पण पुढच्याच चेंडूने त्याच्या उजव्या मांडीला स्पर्श केला आणि मैदानातील पंचांनी त्याला पायचीत बाद दिले. बाद झाल्यानंतर इब्रार शाह अहमदने अभिषेक शर्माला पॅव्हेलियनमध्ये जाण्याचा आक्रमकपणे इशारा केला, ज्यामुळे परिस्थिती चिघळली.
अभिषेक मागे हटला नाही आणि थेट गोलंदाजाकडे जाऊन त्याला जाब विचारला, ज्यामुळे दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून मैदानातील पंचांना हस्तक्षेप करून दोन्ही खेळाडूंना वेगळे करावे लागले. अवघ्या पाच चेंडूंमध्ये १२ धावा करून अभिषेक मैदान सोडून गेला, तेव्हा भारताची पहिली विकेट 68 धावांवर होती. दुसऱ्या टोकाला उभा असलेला 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी अभिषेक लवकर बाद झाल्याने किंवा मैदानातील तणावाने जराही विचलित झाला नाही. त्याने युएईच्या गोलंदाजांना अक्षरशः झोडपून काढले.
🔴HEATED ARGUMENT B/W ABHISHEK SHARMA & UAE PLAYER 🤯
– Why Every team players nowdays Targeting Indian Players after taking their wickets 🤦 https://t.co/1IhkrejAdt
— Sam (@cricsam02) November 24, 2026
वैभवने अवघ्या 16 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर 28 चेंडूंमध्ये आपले शतक ठोकून लिस्ट ए क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद शतकाचा विक्रम रचला. या स्फोटक फलंदाजीने त्याने जेक फ्रेझर-मॅकगर्क, एबी डिव्हिलियर्स, साकिब गनी आणि इशान किशन यांसारख्या दिग्गजांचे विक्रम मागे टाकले.
वैभव सूर्यवंशी तिथेच थांबला नाही, त्याने आपला वेग वाढवत द्विशतक पूर्ण केले. अखेरीस, १३ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर, 53 चेंडूंमध्ये 384 च्या स्ट्राईक रेटने अविश्वसनीय 204 धावा करून वैभव बाद झाला. या ऐतिहासिक आणि स्फोटक खेळीमुळे इंडिया ‘अ’ संघाने अवघ्या 14.2 षटकांत 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकणे आवश्यक होते. टीम इंडिया हे लक्ष्य गाठून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करेल अशी दाट शक्यता होती, पण वैभवने जे केले त्याची कोणीच अपेक्षा केली नव्हती.
