Umran Malik फक्त एका चेंडूमुळे बनला नंबर 1, कुठल्याही भारतीयाला अजूनपर्यंत असा कारनामा नाही जमला
Umran Malik: श्रीलंकेविरुद्ध पहिल्या T20 सामन्यात जबरदस्त प्रदर्शन करतानाच उमरान अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय बनलाय.

मुंबई: टीम इंडियाचा गोलंदाज उमरान मलिकने आपल्या वेगाने क्रिकेट विश्वात नवी ओळख निर्माण केलीय. श्रीलंकेविरुद्ध पहिल्या T20 मॅचमध्येही त्याने चांगली कामगिरी केली. मुंबईमध्ये हा टी 20 सामना झाला. उमरान मलिकने पाटा विकेटवर 4 ओव्हर्समध्ये 27 धावा देऊन 2 विकेट काढल्या. या मॅच दरम्यान उमरान मलिकने एक कारनामा केला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा कोणी अशी कामगिरी केलीय. उमरान मलिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान चेंडू टाकणारा पहिला भारतीय बनलाय.
अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय
उमरान मलिकने 17 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर श्रीलंकेचा कॅप्टन दासुन शनाकाला आऊट केलं. हा तोच चेंडू आहे, ज्यानंतर उमरान मलिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान चेंडू टाकणारा भारतीय बनलाय. उमरान मलिकने 155 किमीप्रतितास वेगाने चेंडू टाकला. कुठल्याही भारतीय गोलंदाजाने टाकलेला हा वेगवान चेंडू आहे.
उमरानने या भारतीय गोलंदाजांना टाकलं मागे
उमरान मलिकने इरफान पठानला मागे टाकलं. त्याने 153.7 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचा वेग 153.36 किमी प्रतितास आहे. मोहम्मद शमीने 153.3 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकलाय. सैनीने 152.8 किमी वेगाने चेंडू टाकला होता. उमरानने या सगळ्या गोलंदाजांना मागे टाकलय. उमरानने याआधी किती वेगात चेंडू टाकलाय?
उमरानने आपल्या वेगाचा हुशारीने वापर केला. उमरानने शनाकाला ज्या चेंडूवर बाद केलं, त्याचा वेग 155 KMPH होता. उमरानने यापेक्षा जास्त वेगाने चेंडू टाकलेत. आयपीएल 2022 मध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना त्याने 157 किमीप्रतितास वेगाने गोलंदाजी केलीय. न्यूझीलंड विरुद्ध 25 नोव्हेंबरला उमरानने 153.1 किमी प्रतितास वेगात चेंडू टाकलाय.
