IND vs AUS SF : वरुण चक्रवर्ती ठरला ‘हेड’मास्टर, ऑस्ट्रेलियाची मिस्ट्री अशी सोडवली Video
ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात सर्वात मोठं आव्हान हे ट्रेव्हिस हेडच होतं. कारण ट्रेव्हिस हेड वारंवार टीम इंडियाचं स्वप्नावर पाणी सोडलं आहे. त्यामुळे त्याची विकेट सोडणं किती महागात पडू शकतं हे क्रीडाप्रेमींना माहिती आहे. झालंही तसंच.. पण वरुण चक्रवर्तीने त्याचं काम करून दाखवलं.

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात भारताची कायम ट्रेव्हिस हेडने कोंडी केली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप असो की वनडे वर्ल्डकप, ट्रेव्हिस हेडने भारताच्या घशातून विजय खेचून आणला आहे. त्यामुळे भारताला त्याची विकेट झटपट घेण्याचं आव्हान होतं. ट्रेव्हिस हेडला शून्यावर बाद करण्याची संधी मोहम्मद शमीकडे चालून आली होती. पण त्या संधीचं सोनं करण्यात त्याला अपयश आलं. हातात आलेला झेल सोडला आणि भारतीय क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली. कारण ट्रेव्हिस हेडला जीवदान मिळालं की अजून आक्रमक खेळतो हा इतिहास आहे. ट्रेव्हिस हेडने त्या संधीचं सोनं केलं.पहिल्या षटकात ट्रेव्हिस हेड शमीला चाचपडत खेळत होता. मात्र त्यानंतरच्या षटकात तीन चेंडूत तीन चौकार मारले. इतकंच काय तर हार्दिक पांड्याला सेट होण्याची संधी दिली नाही. चौकार आणि षटकार मारत त्याला बॅकफूटवर ढकललं. त्यामुळे ट्रेव्हिस हेडचं वादळ शमवण्यासाठी कुलदीप यादवकडे चेंडू सोपवला. पण त्यालाही तसं काही यश आलं नाही. शेवटी रोहित शर्मा मिस्ट्री गोलंदाज म्हणून ख्याती असलेल्या वरुण चक्रवर्तीकडे गेला. वरुण चक्रवर्तीने त्याला बरोबर जाळ्यात ओढलं.
खरं तर वरुण चक्रवर्तीला कसं खेळायचं याचे धडे ट्रेव्हिस हेडने डॅनियल विटोरीकडून घेतले होते. वरुण चेंडू कसा सोडतो वगैरे याचा अभ्यास केला होता. पण या सामन्यात वरुणने त्याला असा चेंडू टाकला आणि प्रेशर हलकं करण्याच्या नादात मोठा फटका मारण्यासाठी गेला. मात्र चेंडू खूपच वर चढला आणि शुबमन गिलने कोणतीही चूक न करता झेल पकडला. षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर त्याने ट्रेव्हिस हेडला गळाला लावलं. ट्रेव्हिस हेडने 33 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 39 धावा केल्या आणि बाद झाला.
Travis Head unleashes havoc with the willow before Varun Chakaravarthy strikes back for India ⚡
Watch live now in India on @StarSportsIndia
Head here for broadcast details in other territories ➡️https://t.co/S0poKnxpTX pic.twitter.com/Dg1tEMxpew
— ICC (@ICC) March 4, 2025
दोन्ही संघांची प्लेइंग 11
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): कूपर कॉनोली, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), अॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, अॅडम झांपा, तनवीर संघा.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
