टीम इंडियाचा मिस्ट्री स्पिनर बाहेर, एशियन गेम्ससाठी या युवा खेळाडूला लागली लॉटरी
भारतीय संघाचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती दुखापतीमुळे आगामी आशियाई खेळांमधूनहीबाहेर पडला आहे. संघ व्यवस्थापनाने तातडीने निर्णय घेत त्याच्या जागी उत्तर प्रदेशचा युवा लेग स्पिनर आणि अष्टपैलू खेळाडूला संधी दिली आहे.

जापानमध्ये होणाऱ्या एशियन गेम्स 2026 स्पर्धेपूर्वी भारतीय क्रिकेट संघाला एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती दुखापतीमुळे या आगामी प्रतिष्ठेच्या स्पर्धेतून अधिकृतपणे बाहेर पडला आहे. संघ व्यवस्थापनाने त्याच्या जागी युवा आणि प्रतिभावान फिरकीपटू विप्रज निगम याचा भारतीय संघात समावेश केला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध खेळवल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यातून वरुण चक्रवर्तीने बऱ्याच काळानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. मात्र, या सामन्यात आपल्या कोट्याची 4 षटके गोलंदाजी केल्यानंतर त्याला दुखापतीचा तीव्र त्रास जाणवू लागला. या दुखापतीमुळे तो अफगाणिस्तानविरुद्धच्या उर्वरित दोन्ही सामन्यांना मुकला होता. आता वैद्यकीय तपासणीनंतर त्याची ही दुखापत गंभीर असल्याचे समोर आल्याने त्याला आशियाई खेळांमधूनही दुर्दैवाने बाहेर व्हावे लागले आहे.
कोण आहे विप्रज निगम?
वरुण चक्रवर्तीच्या जागी संघात संधी मिळालेला विप्रज निगम हा देशांतर्गत क्रिकेटमधील एक उगवता तारा आहे. विप्रज हा प्रामुख्याने उजव्या हाताचा मनगटी फिरकी गोलंदाज आहे. फिरकी गोलंदाजीसोबतच तो खालच्या फळीत उपयुक्त फलंदाजी करण्यासाठीही ओळखला जातो. एक सक्षम अष्टपैलू खेळाडू म्हणून विप्रज निगमची भारतीय संघात झालेली ही एन्ट्री आशियाई खेळांमध्ये भारताची ताकद वाढवू शकते.
🚨 VIPRAJ NIGAM TO TEAM INDIA 🇮🇳
– Vipraj Nigam to replace Varun Chakaravarthy in the Asian Games squad. [Kushan Sarkar] pic.twitter.com/9vo5BplnAb
— Johns. (@CricCrazyJohns) September 16, 2026
विप्रजची क्रिकेट कारकीर्द
विप्रजने यापूर्वी ‘इंडिया ए’ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०२५ मध्ये ऑस्ट्रेलिया ‘ए’ विरुद्धच्या मालिकेसाठी त्याची ‘इंडिया ए’ संघात निवड झाली होती. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स या संघाकडून खेळतो. 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये दिल्लीने त्याला 50 लाख रुपयांना खरेदी केले होते. त्याने आपल्या पहिल्याच आयपीएल सामन्यात लखनौविरुद्ध 15 चेंडूंत 39 धावांची स्फोटक खेळी खेळून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो उत्तर प्रदेश संघाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो. यूपी टी20 लीग आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील त्याच्या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीमुळे तो प्रकाशझोतात आला.
एशियन्स गेम्ससाठी भारतीय संघ
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, नीतीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, विप्रज निगम, रवि बिश्नोई, जसप्रीत बुमराह, यश ठाकुर, अर्शदीप सिंह और वैभव सूर्यवंशी.
