Vishnu Vinod: 29 चेंडूत एकही धावही नाही, त्यानंतर न धावताच ठोकल्या 136 धावा
Kerala vs Puducherry: विजय हजारे ट्रॉफीत केरळने पुडुचेरीला 8 गडी राखून पराभूत केलं. केरळने पुडुचेरीने दिलेलं आव्हान 29 षटकात पूर्ण केलं. विष्णू विनोदच्या आक्रमक खेळीमुळे हा विजय सहज शक्य झाला.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये केरळ विरूद्ध पुडुचेरी सामना पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल केरळच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पुडुचेरीने प्रथम फलंदाजी करताना 47.4 षटकात सर्व गडी गमवून 247 धावा केल्या. तसेच विजयासाठी 248 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान केरळने 29 षटकात 2 गडी गमवून पूर्ण केलं. खरं तर हे आव्हान गाठताना केरळची सुरुवात काही चांगली झाली नाही. 30 धावांवर 2 विकेट पडले होते. कर्णधार रोहन कुन्नम्मल 8 धावांवर, तर यष्टीरक्षक संजू सॅमसन 11 धावा करून तंबूत परतले. पण त्यानंतर विष्णू विनोद मैदानात उतरला आणि या सामन्याचं चित्रच पालटून टाकलं. सामना पुडुचेरीच्या हातातून प्रत्येक फटक्यानंतर वाळूसारखा निसटत गेला. विष्णू विनोदने 84 चेंडूत 13 चौकार आणि 14 षटकार मारत नाबाद 162 धावा केल्या.
विष्णू विनोदने त्याच्या खेळीदरम्याने 29 चेंडू निर्धाव घालवले. त्यात 135 धावा या धाव न घेता केल्या. म्हणजेच 13 चौकार आणि 14 षटकार मारत त्याने 135 धावा केल्या. विष्णू विनोदने त्याच्या लिस्ट ए स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या केली आहे. विजय हजारे ट्रॉफीत विष्णू विनोदने आतापर्यंत 106 षटकार मारले आहेत. स्पर्धेतील सर्वाधिक षटकारांचा विक्रम हा मनीष पांडेच्या नावावर आहे. त्याने 109 षटकार मारले आहेत. त्यामुळे पुढच्या सामन्यात षटकारांचा वर्षाव करताच हा विक्रमही विष्णू विनोद नावावर करेल.
आयपीएलमध्ये विष्णू विनोदच्या नावाची चर्चा रंगली आहे. आता पंजाब किंग्स संघात असून त्याचा फॉर्म पाहता त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळेल यात काही शंका नाही. यापूर्वी आयपीएलमध्ये विष्णू विनोद खेळला आहे. पण त्याला हवी तशी संधी मिळालेली नाही. 2017 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. आरसीबीकडून फक्त तीन सामने खेळला आहे. 2023 मध्ये विष्णू विनोद तीन आयपीएल सामने खेळला होता. मागच्या पर्वात पंजाब किंग्सचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र जेतेपदाचं स्वप्न काही पूर्ण झालं नाही. यंदा जेतेपदाचं स्वप्न पाहता विष्णू विनोदला खेळण्याची संधी मिळाली तर काय करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
