कर्णधार Harmanpreet Kaur चा शतकी झंझावात, इंग्लंड विरुद्ध मोठ्या विक्रमाची बरोबरी
Harmanpreet Kaur Century : भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात 102 धावांची खेळी केली. हरमनप्रीतने या दरम्यान 82 चेंडूत सातवं एकदिवसीय शतक पूर्ण केलं. हरमनप्रीतने यासह काही खास विक्रम नोंदवले आहेत.

इंग्लंड वूमन्स विरुद्ध इंडिया वूमन्स यांच्यात एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना चेस्टर ली स्ट्रीट येथे खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने वादळी आणि झंझावाती शतक ठोकलं आहे. हरमनप्रीतने अवघ्या 82 चेंडूत शतक ठोकत अनेक विक्रम आपल्या नाववर केले आहेत. तसेच हरमनप्रीतने काही विक्रमांची बरोबरी केली आहे. हरमनप्रीतच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे सातवं शतक ठरलं आहे. हरमनप्रीतने यासह माजी कर्णधाराच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. हरमनप्रीतने मिताली राज हीच्या एकदिवसीय शतकांच्या विक्रमाची बरोबरी साधली.
भारतीय महिला संघाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम हा स्मृती मंधाना हीच्या नावावर आहे. स्मृतीने सर्वाधिक 11 शतकं झळकावली आहेत. स्मृतीने 105 डावात ही कामगिरी केली आहे. तर या यादीत हरमनप्रीत कौर आणि मिताली राज दोघीही संयुक्तरित्या विराजमान आहेत. दोघींनीही प्रत्येकी 7-7 शतकं झळकावली आहेत.
हरमनप्रीतने 129 व्या डावात 7 शतकं पूर्ण केली. तर मिताली राजने 211 व्या डावात सातवं शतक ठोकलं होतं.त्यानंतर या यादीत पूनम राऊत तिसऱ्या स्थानी आहे. पूनमने 73 डावांत 3 शतकं ठोकली होती.चौथ्या क्रमांकावर थिरुश कामिनी आहे. थिरुशने 37 डावांत 2 शतकं झळकावली होती.
दुसरं वेगवान शतक
हरमनप्रीतने या शतकासह आणखी एक कारनामा केला. हरमनप्रीत भारताकडून वेगवान एकदिवसीय शतक करणारी दुसरी फलंदाज ठरली. वेगवान शतकाचा विक्रम हा स्मृती मंधाना हीच्या नावावर आहे. स्मृतीने आयर्लंड विरुद्ध अवघ्या 70 चेंडूत कडकडीत शंभर धावा ठोकल्या होत्या. तर आता हरमनप्रीतने 82 बॉलमध्ये शतकापर्यंतचा प्रवास पूर्ण केला. या यादीत तिसऱ्या स्थानीही हरमनप्रीत विराजमान आहे. हरमनप्रीतने 2024 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 85 चेंडूत शतक केलं होतं.
4 हजार धावा
हरमनप्रीतने या शतकासह एकदिवसीय क्रिकेटमध्ये 4 हजार धावा पूर्ण केल्या. हरमनप्रीत 4 हजार धावा करणारी एकूण 17 वी तर तिसरी भारतीय महिला फलंदाज ठरली. भारतासाठी याआधी फक्त स्मृती मंधाना आणि मिताली राज या दोघींनीच अशी कामगिरी करुन दाखवली आहे. हरमनप्रीने 129 डावांत 400 हजार धावा पूर्ण केल्या.
इंग्लंडसमोर 319 धावांचं आव्हान
दरम्यान हरमनप्रीतच्या शतकाव्यतिरिक्त भारतासाठी जेमिमाह रॉड्रिग्ज हीने 50 धावा केल्या. तर हर्लिन देओल आणि स्मृती मंधाना या दोघींनी प्रत्येकी 45-45 धावा केल्या. तर इतरांनी दिलेल्या योगदानाच्या जोरावर भारताने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 318 धावा केल्या. त्यामुळे आता इंग्लंड 319 धावा करत सामन्यासह मालिका जिंकणार का? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
