चॅम्पियन्स ट्रॉफीत ऋषभ पंतला बेंचवर बसवण्याचं कारण काय? गौतम गंभीरने सर्वकाही केलं उघड
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाने उपांत्य फेरीपर्यंत चार सामने खेळले आहेत. या चार सामन्यात फक्त एकच बदल प्लेइंग 11 मध्ये करण्यात आला. हार्षित राणाऐवजी वरुण चक्रवर्तीला संघात स्थान मिळालं. या व्यक्तिरिक्त अर्शदीप सिंग आणि ऋषभ पंतला बेंचवरच बसावं लागलं आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करत टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरी आणि न्यूजीलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया त्याच प्लेइंग 11 सह उतरली होती. आतापर्यंत टीम इंडिया या स्पर्धेत एकूण चार सामने खेळली आहे. यात ऋषभ पंत आणि अर्शदीप सिंग वगळता इतरांना प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली. ऋषभ पंत ऐवजी केएल राहुलला प्लेइंग 11 मध्ये स्थान देणं हे सर्वांसाठी आश्चर्यकारक होतं. चारही सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी केएल राहुलवर विश्वास टाकला. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये या निर्णयावरून चर्चेला उधाण आलं आहे. ऋषभ पंत ऐवजी केएल राहुलच का असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित आहेत. यावर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने स्पष्टीकरण दिलं आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने याबाबत आपलं म्हणणं मांडलं.
‘केएल राहुलचा वनडे क्रिकेटमधील सरासरी ही 50 आहे आणि हेच याचं उत्तर आहे. लोकं माझ्याबाबत काय म्हणतात याबाबत मला काहीच वाटत नाही. ते या बाबत काय विचार करतात, त्याच्याकडे काही अजेंडा आहे का? माझं काम 140 कोटी भारतीय आणि ड्रेसिंग रुममध्ये आपल्या खेळाडूंसोबत प्रामाणिक राहायचं आहे.’, असं गौतम गंभीर म्हणाला. केएल राहुलने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. टीम इंडियाला गरज असताना एक बाजू सावरून धरली.
ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात विराट कोहली 84 धावा करून बाद झाला. त्यानंतर एका बाजूने केएल राहुलने मोर्चा सांभाळला. केएल राहुलने 34 चेंडूत नाबाद 42 धावांची खेळी केली. यात त्याने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. दुसरीकडे, केएल राहुल वनडे क्रिकेटमध्ये पाचव्या स्थानावर फलंदाजीसाठी उतरतो. केएल राहुलने सांगितलं की, प्रामाणिकपणे सांगायचं तर मी 2020 पासून पाचव्या क्रमांकावर खेळत आहे. लोकं विसरून जातात की मी या क्रमांकावर फलंदाजी करत आहे.
