कोणत्या बॅटरला गोलंदाजी करताना भीती वाटते? जसप्रीत बुमराहने दिलं असं उत्तर
जसप्रीत बुमराह जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने आपल्या गोलंदाजीने हे करून दाखवलं आहे. अनेकदा विरोधकांच्या पारड्यात असलेला विजय आपल्याकडे खेचून आणला आहे. असं असताना जसप्रीत बुमराह गोलंदाजी करताना कोणाला घाबरतो का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. पण या प्रश्नाचं उत्तर त्याने स्वत: दिलं आहे.

भारताने नुकतंच आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धेवर नाव कोरलं आहे. या स्पर्धेत भारताकडून जसप्रीत बुमराहने जबरदस्त गोलंदाजी केली होती. इतकंच काय क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये जसप्रीत बुमराहची भेदक गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे फलंदाजांची त्याच्या समोर तग धरण्याची हिम्मत होत नाही. कसंतरी करून जसप्रीत बुमराहची षटकं संपावी अशी वाट पाहावी लागते. जसप्रीत बुमराहने आपल्या भेदक गोलंदाजीने फलंदाजांच्या डोक्यात भीतीचं घर केलं आहे. जसप्रीत बुमराह समोर असला की चांगल्या चांगल्या फलंदाजांची भंबेरी उडते, हे सांगायला नको. असं असताना जसप्रीत बुमराह गोलंदाजी करताना कोणाला घाबरतो का? असा प्रश्न पडतो. तर त्याचं उत्तर खुद्द जसप्रीत बुमराहने दिलं आहे. चेन्नईत एका कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात जसप्रीत बुमराहने हजेरी लावली. तेव्हा त्याने या प्रश्नाचं उत्तर दिलं.
असा कोणता बॅट्समन आहे का? त्याला गोलंदाजी करताना भीती वाटते, असा प्रश्न शो अँकरने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विचारला. जसप्रीत बुमराहने या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाला की, ‘बघा, मी प्रश्नाचं चांगलं उत्तर देऊ शकतो. पण खरं सांगायचं तर मला कोणालाही माझ्या डोक्यावर बसवायचं नाही. मी सर्वांचा आदर करतो. मी माझ्या डोक्यात फक्त इतकंच ठेवतो की, जर मी माझं काम व्यवस्थित केलं तर या जगात मला कोणीही थांबवू शकत नाही. हे सर्व पाहता मी समोर कोण आहे हे न पाहता माझ्याकडे लक्ष केंद्रीत करतो. जर ती संधी मी मला दिली तर मी समोरच्याला रोखू शकतो. ही पॉवर मी समोरच्याला आणि तो चांगला फलंदाज आहे असं मला करायचं नाही.’
Jasprit Bumrah on batters tough to bowl to. 🙇♂️
– Bumrah with a Boom answer! pic.twitter.com/xd06WahoHu
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 29, 2024
टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर जसप्रीत बुमराह आराम करत आहे. झिम्बाब्वे आणि श्रीलंका दौऱ्यावर गेला नव्हता. तसेच दुलीप ट्रॉफी देशांतर्गत क्रिकेटमध्येही खेळत नाही. खरं तर दुखापतीनंतर जसप्रीत बुमराहने जबरदस्त कमबॅक केलं आहे. जवळपास वर्षभर जसप्रीत बुमराह क्रिकेटपासून दूर होता. जुलै 2022 मध्ये इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात पाठदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तिसरा वनडे सामना खेळला नाही. 2022 मधील आशिया कप स्पर्धेला मुकला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेसाठी कमबॅक केलं. पण सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध टी20 खेळला नाही. टी20 वर्ल्डकप 2022 स्पर्धेत बुमराहशिवाय टीम इंडिया गेली. मार्च 2023 मध्ये त्याच्या सर्जरी झाली होती. चार महिने नॅशनल क्रिकेट अकादमीत त्याने मेहनत घेतली.
आयपीएल 2023 स्पर्धेतही खेळला नव्हता. पण त्यानंतर त्याने कमबॅक केलं, तसेच गोलंदाजीला धार असल्याचं दाखवून दिलं. आयर्लंड दौऱ्यात त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा खेळला. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत त्याने गोलंदाजीची जादू दाखवली.
