मिचेल स्टार्कवर कोलकात्याने कोट्यवधी रुपयांची उधळण का केली? गौतम गंभीर म्हणाला…
आयपीएल 2024 मिनी लिलावात आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले. मिचेल स्टार्कसाठी कोट्यवधी रुपयांची उधळण झाली. 33 वर्षीय मिचेल स्टार्कसाठी इतकी मोठी रक्कम मोजण्याचं कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आता कोलकात्याचा मेंटॉर गौतम गंभीर याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबई : आयपीएल 2024 साठी झालेला मिनी लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर पैशांची उधळण झाली. पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ट्रेव्हिस हेड यांनी कोट्यवधी रुपये कमावले. खऱ्या अर्थाने यांनी आयपीएल लिलावातील अर्ध्याहून अधिक रक्कम कमावली असं म्हणायला हरकत नाही. मिचेल स्टार्कसाठी तर गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात जबरदस्त चुरस पाहायला मिळाली. दोन कोटी बेस प्राईस असलेल्या मिचेल स्टार्कला 12 पट अधिक रक्कम मिळाली. कोलकाता नाईट रायडर्स बोली लावताना मागे पुढे जराही पाहिलं नाही. गुजरातने बोली लावताच दुसऱ्या बाजूला वरचढ बोली तयार असायची. बघता बघता ही किंमत 24 कोटींच्या पुढे गेली. अखेर कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी रुपये मोजून मिचेल स्टार्कला आपल्या संघात घेतलं आहे. आयपीएल इतिहासातील लिलावातील ही सर्वात मोठी रक्कम मोजली गेली आहे. पण 33 वर्षीय मिचेल स्टार्कसाठी इतके पैसे मोजण्याची खरंच गरज होती का? मागच्या दोन वर्षातील फॉर्मही काही खास नाही, मग त्याला निवडलं का? या सर्वांची उत्तरं गौतम गंभीरने दिली आहेत.
काय म्हणाला गौतम गंभीर?
गौतम गंभीरने मिचेल स्टार्कबाबत सांगितलं की, ” स्टार्क एक्स फॅक्टर आहे, यात काही शंका नाही. हा खेळाडू नव्या चेंडूसह गोलंदाजी करू शकतो. डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करण्याची त्याची क्षमता आहे. तसेच तो गोलंदाजीच्या ताफ्यातील एक प्रमुख अस्त्र आहे. त्याच्या संघात असण्याने देशांतर्गत गोलंदाजांना मदत होईल. कारण संघातील दोन भारतीय नवोदीत वेगवान गोलंदाजांमध्ये चांगली क्षमता आहे. त्यांच्या मदतीसाठी कोणाची तर गरज आहे. मिचेल स्टार्क भूमिका योग्य पद्धतीने बजावू शकतो.”
“आमच्या गोलंदाजींचा ताफा मजबूत आहे. आम्ही कायम आक्रमक गोलंदाजीसाठी आग्रही होतो. आमच्याकडे मुजीब उर रहमान, गस एटकिंसन, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती आणि मिचेल स्टार्क यांच्यासह बरेच पर्याय आहेत. आमच्याकडे वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि सुयश शर्मासह चेतन सकारियाही आहे. त्यामुळे आम्ही जबरदस्त कॉम्बिनेशनसह मैदानात उतरू शकतो. मी कायम मजबूत फलंदाजीपेक्षा गोलंदाजीला प्राधान्य देतो.”, असंही गौतम गंभीर म्हणाला.
“केकेआर माझ्यासाठी एक टीम आणि एक भावना आहे. मी सात वर्षे केकेआरसोबत खेळलो आहे. कोलकात्याच्या चाहत्यांकडून मला भरभरून प्रेम मिळालं आहे. 2012 आणि 2014 मध्ये जेतेपद मिळवलं होतं. आम्ही यंदा जिंकू की नाही हा काही प्रश्न नाही. पण आम्ही जिंकण्यासाठीच उतरू.”, असंही गौतम गंभीरने पुढे सांगितलं.
