तर देशात रेल्वेची चाकं थांबणार, बच्चू कडू पुन्हा आक्रमक, थेट मोठी घोषणा
मोठी बातमी समोर येत आहे, बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांनी सरकारला इशारा दिला आहे, कर्जमाफी झाली नाही तर रेल्वेरोखो करू असं त्यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नागपुरात मोठं आंदोलन केलं होतं. बच्चू कडू यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळाला होता, बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या काळामध्ये नागपुरात मोठ्या संख्येनं शेतकरी हजर होते, दरम्यान त्यानंतर अखेर सरकारने बच्चू कडू यांना चर्चेसाठी मुंबईत बोलावलं, बच्चू कडू यांच्यासोबत झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील उपस्थिती होती. या बैठकीमध्ये बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे ही आपली मागणी लावून धरली, अखेर सरकारने 30 जून पर्यंत कर्जमाफी करू असा शब्द बच्चू कडू यांना दिला आहे. मात्र त्यानंतर आता दुसरीकडे सरकारने शेतकऱ्यांची कर्ज वसुली बंद करण्याचा देखील निर्णय घेतला आहे. यावर प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे.
नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?
सरकारने एकीकडे वसुली बंद केली तर दुसरीकडे कर्जमाफी करू असे सांगितले आहे. सरकारने सगळा घोळ केला आहे, आम्ही आम्हाला सरकारने कर्जमाफीसाठी जी वेळ दिली होती, त्या वेळेची वाट पाहात आहोत. 30 जूनपर्यंत कर्जमाफी झाली नाही, तर 1 जुलै ला देशातील रेल्वेचे सगळे चाक थांबतील, देश ठप्प करू मग मुख्यमंत्री रेल्वे कशी सुरू करतात ते बघू, रुळावर माणूस दिसणार नाही पण रेल्वे पूर्णपणे थांबेल. मी काल रात्री नागपूरच्या आसपासच्या सगळ्या रेल्वे रुळाची पाहणी केली, रेल्वे कुठून कशी थांबवायची याचं सगळं नियोजन करून ठेवलं आहे, फक्त वाट पाहा असा इशारा यावेळी बच्चू कडू यांनी दिला आहे.
दरम्यान बिबट्या पाळायला द्या अशी मागणी करणे म्हणजे एक प्रकारे टिंगल उडविणे आहे , इकडे लोक मरत आहेत, त्याचं काही नाही. कोणी म्हणते बिबट्या साठी बकऱ्या सोडा कोणी पाळायला द्या म्हणते, त्यापेक्षा डुकर पाळा म्हणावं त्यांना, असा घणाघातही यावेळी बच्चू कडू यांनी केला आहे.
