Arshdeep Singh: अर्शदीप सिंहला पहिल्या टी20 सामन्यात का घेतलं नाही? जाणून घ्या कारण
Australia vs India, 1st T20I: भारत ऑस्ट्रेलिया पहिल्या टी20 सामन्याला सुरुवात होताच चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला प्लेइंग 11 मधून बाहेर ठेवलं होतं. टी20 क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजाला बाहेर का बसवलं? याबाबत चर्चा रंगली आहे. चला जाणून घेऊयात त्याबाबत

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यातून अर्शदीप सिंगला वगळण्यात आलं. आशिया कप स्पर्धेतही असंच चित्र पाहायला मिळालं होतं. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही प्लेइंग 11 मध्ये स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. टीम इंडियात अर्शदीपच्या जागी हार्षित राणाला संधी दिली गेली आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींच्या तळपायची आग मस्तकात गेली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला आहे. इतकंच काय तर इरफान पठाणने देखील अर्शदीप सिंगचं नाव लिहून ट्वीट केलं आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून आता प्लेइंग 11 निवडीवर टीका होत आहे. पण असं का केलं असावं? त्याचं कारण काय? असे एक ना अनेक प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. तुम्हालाही असेच प्रश्न पडले असतील तर त्याचं उत्तर जाणून घेऊयात.
अर्शदीपला का संघाचं बाहेर ठेवलं?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्शदीप सिंगने भारतासाठी 101 विकेट घेतल्या आहेत.टी20 क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणारा एकमेव खेळाडू आहे. मात्र असं असूनही त्याला प्लेइंग इलेव्हनमधून डावलण्यात आलं. याचं प्रमुख कारण म्हणजे संघ व्यवस्थापनाच्या योजनेत अर्शदीप फिट बसत नाही. त्यामुळे त्याला बाजूला ठेवलं आहे. भारताने या मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने जिंकले तर त्याचा तिसऱ्या सामन्यात विचार केला जाऊ शकतो. कारण ऑस्ट्रेलियातील खेळपट्टी उसळी घेणारी आहे. त्यामुळे हार्षित राणाला संधी दिली जात आहे. कारण खांद्याचा पुरेपूर वापर करून बाउंस टाकण्याची कला आहे. तर अर्शदीप सिंग स्विंग बॉलर आहे.
अर्शदीप ऐवजी हार्षित राणाच का?
हार्षित राणा गोलंदाजीसोबत नवव्या क्रमांकावर येऊन वेगाने धावा करण्याची क्षमता ठेवतो. त्यामुळे त्याला अर्शदीप ऐवजी संधी दिली जाते अशी चर्चाही सोशल मीडियावर रंगली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात हार्षित जबरदस्त फलंदाजी केली होती. त्यामुळे हार्षित राणाला वारंवार संधी दिली जात आहे. दुसरीकडे, सिडनी वनडे सामन्यात त्याने चार विकेट घेऊन टीकाकारांची तोंडं बंद केली होती. पण असं असूनही या निर्णयाने क्रीडाप्रेमी नाराज आहेत.
