WI vs AUS : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पराभवानंतर ऑस्ट्रेलिया संघात मोठा बदल, वेस्ट इंडिजविरुद्ध या प्लेइंग 11 सह मैदानात
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. यानंतर ऑस्ट्रेलिया संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या मालिकेसाठी संघात मोठा बदल करण्यात आला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. श्रीलंका-बांग्लादेश, भारत-इंग्लंड या कसोटी मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज हे संघ आमनेसामने आले आहे. ऑस्ट्रेलिया दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या सामन्यातील पहिला सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला की, ‘आम्ही आधी बॅट घेऊ. खेळपट्टी चांगली दिसतेय. परदेशात मालिका नेहमीच कठीण असते. जवळजवळ काही आठवड्यांपूर्वीसारखीच. स्मिथची उणीव भासेल. त्याचे झेलही.’ वेस्ट इंडिजचा कर्णधार रोस्टन चेस म्हणाला की, ‘आम्हीही फलंदाजी केली असती. मला वाटतं की घरच्या मैदानावर खेळणं ही एक चांगली भावना आहे. आशा आहे की आपण चांगले क्रिकेट खेळू आणि विजयी होऊ. फक्त खेळाडूंनी उत्साहाने खेळावे अशी माझी इच्छा आहे. किंग पदार्पण करत आहे. लाल चेंडूचे क्रिकेट खेळण्याची ही संधी आहे.’ दरम्यान, सॅम कोन्टास अवघ्या 3 धावा करून तंबूत परतला.
ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. ही मालिका दोन्ही संघासाठी महत्त्वाची आहे. विजयी टक्केवारी चांगली ठेवण्यासाठी विजय खूपच महत्त्वाचा आहे. ऑस्ट्रेलिया 2025-2027 या पर्वात एकूण 20 कसोटी सामने खेळणार आहे. यात इंग्लंडविरुद्ध पाच, दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 3, न्यूझीलंडविरुद्ध 3, भारताविरुद्ध 5 आणि बांगलादेशविरुद्ध 2 कसोटी सामने खेळणार आहे. मागच्या पर्वात अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेने पराभवाची धूळ चारली होती. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा जेतेपदाचं स्वप्न भंगलं होतं.
दोन संघाचा प्लेइंग 11
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, कॅमेरून ग्रीन, जोश इंग्लिस, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवुड.
वेस्ट इंडिज (प्लेइंग इलेव्हन): क्रेग ब्रेथवेट, जॉन कॅम्पबेल, केसी कार्टी, ब्रँडन किंग, रोस्टन चेस (कर्णधार), शाई होप (यष्टीरक्षक), जस्टिन ग्रीव्हज, जोमेल वॉरिकन, अल्झारी जोसेफ, शमार जोसेफ, जेडेन सील्स.
