WI vs AUS: वेस्टइंडिजमध्ये नंबर 1 ऑस्ट्रेलिया ढेर, स्टार फलंदाज फ्लॉप, जोसेफ-सील्सचा धमाका
West Indies vs Australia 1st Test Day 1 Stumps : वेस्टइंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी गोलंदाजांचा धुमधडाका पाहायला मिळाला. पहिल्या दिवशी एकूण14 फलंदाज आऊट झाले. जाणून घ्या सविस्तर.

ऑस्ट्रेलियाला नुकत्याच झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 फायनलमध्ये पराभूत व्हावं लागलं. दक्षिण आफ्रिकेने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप ट्रॉफीवर नाव कोरलं. दक्षिण आफ्रिकेने यासह ऑस्ट्रेलियाला सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप ट्रॉफी जिंकण्यापासून यशस्वीरित्या रोखलं. त्यानंतर आता उपविजेता ऑस्ट्रेलिया वेस्टइंडिज दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियाची विंडीज विरुद्धची ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 साखळीतील पहिलीच मालिका आहे. या मालिकेतील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 25 जूनपासून सुरुवात झाली आहे. आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी असलेली ऑस्ट्रेलिया सलामीच्या सामन्यातील पहिल्याच दिवशी विंडीजसमोर ढेर झाली.
बारबाडोसमध्ये खेळवण्यात येत असलेल्या पहिल्या सामन्यातील पहिला दिवस हा गोलंदाजांच्या नावावर राहिला. पहिल्या दिवशी 14 विकेट्स पडल्या. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी विंडीजच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. ऑस्ट्रेलियाला 200 पारही पोहचता आलं नाही. विंडीजने कांगारुंना 180 धावांवर गुंडाळलं.
ऑस्ट्रेलियाच्या चौघांनाच फक्त दुहेरी आकडा गाठता आला. ऑस्ट्रेलियासाठी ट्रेव्हिस हेड याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. हेडने 78 बॉलमध्ये 59 रन्स केल्या. तर ओपनर उस्मान ख्वाजा याची अर्धशतक करण्याची संधी हुकली. ख्वाजाने 128 चेंडूत 47 धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्स याने 28 धावांचं योगदान दिलं. तर ब्यू वेबस्टर याने 11 रन्स केल्या. या व्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. विंडीजसाठी जेडन सिल्स आणि शामर जोसेफ या जोडीने धमाका केला. जेडनने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर शामर जोसेफने चौघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. जस्टिन ग्रीव्हज याने 1 विकेट मिळवली.
विंडीजचीही दाणादाण
ऑस्ट्रेलियाला 181 धावांवर गुंडाळल्यानंतर विंडीजचीही तशीच स्थिती झाली. विंडीजने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 57 धावा केल्या. विंडीजची सलामी जोडी फ्लॉप ठरली. मिचेल स्टार्क याने क्रेग ब्रेथवेट याला 4 तर जॉन कॅम्पबेलला 7 धावांवर आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. केसी कार्टी याने 20 धावा जोडल्या. तर जोमेल वॅरीकन याला भोपळाही फोडता आला नाही. ब्रँडन किंग आणि कॅप्टन रोस्टन चेज ही जोडी दिवसाचा खेळ संपल्यांनतर नाबाद परतली. ब्रँडन 23 तर रोस्टन 1 धाव करुन नाबाद आहेत.
पहिल्याच दिवशी 14 विकेट्स
Back at it tomorrow for Day 2️⃣.#WIvAUS #FullAhEnergy pic.twitter.com/hkD3IHArGd
— Windies Cricket (@windiescricket) June 25, 2025
विंडीज अजूनही 123 धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे विंडीजचा आघाडी घेण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाचा विंडीजला आघाडी घेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न असेल. आता यात कोण यशस्वी ठरतो? हे दुसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान स्पष्ट होईल.
