WI vs IND 2nd Odi | विंडिज विरुद्ध प्रयोग फसला, टीम इंडिया तोंडावर पडली
World Cup 2023 | वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक असताना टीम इंडियाला असे धाडसी प्रयोग करणं चांगलंच भोवलंय.

त्रिनिदाद | वेस्ट इंडिज आयसीसी वर्ल्ड कप क्वालिफायर स्पर्धेतून बाहेर पडली. त्यामुळे भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत वेस्ट इंडिज पहिल्यांदाच खेळताना दिसणार नाही. त्यानंतर आता विंडिज टीम इंडिया विरुद्ध कसोटीनंतर एकदिवसीय मालिका खेळत आहे. विंडिजला लिंबूटिंबू टीम समजून त्यांच्या विरुद्ध प्रयोग करणं टीम इंडियाच्या चांगलंच अंगाशी आलंय. या प्रयोगामुळे टीम इंडियाला मालिका गमावण्याची वेळ आली आहे.
नक्की काय झालं?
विंडिज विरुद्धच्या पहिल्या वनडेत टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना झटकाच लागला. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांना विश्रांती देण्यात आली. त्यामुळे उपकर्णधार म्हणून हार्दिक पंड्या याला कॅप्टन्सीची जबाबदारी देण्यात आली. तर विराट याच्या जागी संजू सॅमसन याला संधी देण्यात आली. हाच प्रयोग टीम इंडियाच्या चांगलाच अंगाशी आला.
ईशान किशन आणि शुबमन गिल या सलामी जोडीने 90 रन्सची पार्टनरशीप केली. शुबमन 34 आणि ईशान 55 धावा करुन माघारी परतले. त्यानंतर उर्वरित 8 विकेट्स टीम इंडियाने 91 धावांच्या मोबदल्यात गमावल्या. त्यामुळे टीम इंडियाचा डाव 181 धावांवर आटोपला.
संजू सॅमसन आणि अक्षर पटेल फ्लॉप
संजू सॅमसन याला या सामन्यात संधी देण्यात आली. संजूला संधी दिली जात नसल्याने नेटकऱ्यांने आक्रोश केला होता. टीम इंडिया अडचणीत असताना संजूला संकटमोचकाची भूमिका बजावण्याची संधी होती. मात्र संजूला या संधीचं सोन करता आलं नाही. तर अक्षर पटेल यानेही निराशा केली. अक्षरला फक्त 1 रन करता आला. इतरांनीही फार काही विशेष केलं नाही. पण अक्षर आणि संजूकडून मोठी अपेक्षा होती.
विंडिजने 181 धावांचं आव्हान हे फक्त 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. विंडिजने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. मालिका बरोबरीत सुटल्याने तिसरा सामन्यात चढाओढ पाहायला मिळणार आहे. तसेच मालिका गमावण्याचा धोकाही टीम इंडियाला आहे. टीम इंडियाने विंडिज विरुद्ध 2007 नंतर एकदाही एकदिवसीय मालिका गमावलेली नाही. मात्र या प्रयोगांमुळे ती वेळ आली आहे.
किती चूक किती बरोबर?
वनडे वर्ल्ड कपला मोजून 70 दिवसांपेक्षा कमी कालावधी बाकी आहे. आगामी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा प्रवास सुरु झालाय. मात्र या वर्ल्ड कपच्या तोंडावर टीम इंडियाने असेच प्रयोग सुरु ठेवले तर, टीम इंडियाला येत्या काळात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, अलिक अथानाझे, शिमरॉन हेटमायर, केसी कार्टी, रोमारियो शेफर्ड, यानिक कॅरिया, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोटी आणि जेडेन सील्स.
