Women’s T20 World Cup 2024: 3 ऑक्टोबरपासून स्पर्धेला सुरुवात, सामने कधी कुठे पाहता येतील ते जाणून घ्या
वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेला 3 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेकडे क्रीडाविश्वाचं लक्ष लागून आहे. भारताचा पहिला सामना 4 ऑक्टोबरला होणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध भारताचा पहिला सामना असणार आहे. ही संपूर्ण स्पर्धा कुठे आणि कधी पाहता येईल ते जाणून घ्या.
वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत एकूण 10 संघांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेचं हे नववं पर्व असून आतापर्य़ंतच्या आठ पर्वात ऑस्ट्रेलियाचं वजन दिसलं आहे. ऑस्ट्रेलियाने 6 जेतेपदावर नाव कोरलं आहे. तर इंग्लंड आणि वेस्ट इंडिजने प्रत्येकी एकदा जेतेपद मिळवलं आहे. भारताला जेतेपदाची एकदा संधी चालून आली होती. पण अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने पराभूत करत स्वप्नभंग केला. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाच-पाच दोन गट करण्यात आले आहेत. दोन्ही गटातून प्रत्येकी दोन संघांना उपांत्य फेरीत खेळण्याची संधी मिळेल. 3 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत एकूण 23 सामने खेळले जाणार आहेत. पहिल्याच दिवशी दोन सामने होणार आहेत. पहिला सामना बांग्लादेश आणि स्कॉटलंड यांच्यात होईल. तर दुसरा सामना पाकिस्तान आणि श्रीलंकेत होणार आहे. हे दोन्ही सामना शारजाहमध्ये खेळवले जाणार आहेत.
भारत खेळत असलेल्या गटात पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दिग्गज संघ आहेत. त्यामुळे या गटात अव्वल दोन मध्ये जागा मिळवण्याचं मोठं आव्हान असणार आहे. या गटात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचं तगडं आव्हान असेल. तर एशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रीलंकेने पराभूत केलं होतं हे विसरून चालणार नाही. त्यामुळे साखळी भारताला ताक फुंकूनच प्यावा लागणार आहे.
वर्ल्ड कपसाठी भारतीय महिला संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना, शफाली वर्मा, दीप्ति शर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, ऋचा घोष, यास्तिका भाटिया (फिटनेसवर अवलंबून आहे), पूजा वस्त्राकर, अरुंधति रेड्डी, रेणुका सिंह ठाकुर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटिल (फिटनेसवर अवलंबून आहे), सजना सजीवन.
वुमन्स टी20 वर्ल्डकप कधी सुरू होत आहे?
वुमन्स टी20 वर्ल्डकप 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.
महिला T20 विश्वचषक कोठे होत आहे?
यूएईमध्ये वुमन्स टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेचे आयोजन केले आहे.
टीव्हीवर वुमन्स टी20 वर्ल्डकप 2024 कुठे पाहू शकता?
वुमन्स टी20 वर्ल्डकप भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर प्रसारित केला जाईल.
वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रीमिंग कोठे होईल?
डिस्ने प्लस हॉटस्टारच्या ॲप आणि वेबसाइटवर वुमन्स टी20 वर्ल्डकपचे लाईव्ह स्ट्रीमिंग होईल.