IND vs PAK : रविवारी महामुकाबला, टीम इंडिया-पाकिस्तान भिडणार, सामना किती वाजता?
India vs Pakistan U19 Asia Cup 2025 : अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धेतील पाचव्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामन्याचा थरार रंगणार आहे. दोन्ही संघांनी या स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. त्यामुळे दोन्ही संघांना सलग दुसरा सामना जिंकण्याची समान संधी आहे.

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या 2 कट्टर आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी संघाच्या सामन्याची चाहत्यांना कायमच प्रतिक्षा असते. टीम इंडियाने गेल्या काही महिन्यांत सातत्याने विविध वयोगटातील क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानवर मात करत आपला दबदबा कायम ठेवला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा हे 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघ पुन्हा एकदा आामनेसामने येण्यासाठी सज्ज झाले आहेत. टीम इंडिया आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ अंडर 19 वनडे आशिया कप 2025 स्पर्धेत भिडणार आहेत. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील दुसरा सामना असणार आहे. दोन्ही संघांनी या स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या विजयासाठी दोन्ही संघात चुरस पाहायला मिळणार आहे.
टीम इंडिया पाकिस्तान यांच्यातील सामना हा रविवारी 14 डिसेंबरला होणार आहे. या सामन्याला मोजून काही तासांचा अवधी बाकी आहे. या सामन्याचं आयोजन हे दुबई स्थितीत आयसीसी अकादमी ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 10 वाजता टॉस होणार आहे.
भारत-पाकिस्तानची विजयी सलामी
अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धेला 12 डिसेंबरपासून सुरुवात झाली. टीम इंडिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी या स्पर्धेत विजयी सुरुवात केली. टीम इंडियाने यूएई तर पाकिस्तानने मलेशियावर मात केली. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी आपला पहिला सामना हा 200 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने जिंकला.
भारताचा यूएईवर 234 धावांनी विजय
टीम इंडियाने यूएईवर 234 धावांनी मात केली. वैभव सूर्यवंशी याच्या 171 धावांच्या खेळीच्या जोरावर यूएई विरुद्ध 433 धावा केल्या. यूएईला प्रत्युत्तरात 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 199 धावांपर्यंतच पोहचता आलं.
पाकिस्तानकडून मलेशियाचा 297 धावांनी धुव्वा
तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानने टीम इंडियापेक्षा जास्त धावांच्या फरकाने आपला पहिला सामना जिंकला. पाकिस्तानने मलेशियाला 297 धावांनी लोळवलं. पाकिस्तानने मलेशिया विरुद्ध 345 धावा केल्या. त्यानंतर पाकिस्तानने मलेशियाला 48 धावांवर गुंडाळलं.
रविवारी कोण जिंकणार?
भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांनी पहिल्याच सामन्यात 300 पेक्षा अधिक धावा केल्या. तसेच दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे आता रविवारी 14 डिसेंबरला कोणता संघ सलग दुसरा सामना जिंकतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
