IND vs PAK : 20 जुलैला महामुकाबला, भारत विरुद्ध पाकिस्तान भिडणार, जाणून घ्या
India Champions vs Pakistan Champions : वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेंड्स 2025 स्पर्धेत एकूण 6 संघ भिडणार आहेत. मात्र या स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्याची क्रिकेट चाहत्यांना कायम प्रतिक्षा असते. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील अखेरचा सामना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत खेळवण्यात आला होता. टीम इंडियाने पाकिस्तानचा त्या सामन्यात धुव्वा उडवत आपला दबदबा कायम ठेवला होता. त्यानंतर पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संबंध ताणले गेले. त्यामुळे टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध खेळणार नाही, असं म्हटलं जात होतं. मात्र सध्या तरी तसं चित्र पाहायला मिळत नाही, असं म्हटलं तर चुकीचं ठकणार नाही. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 20 जुलै रोजी सामना होणार आहे. मात्र फरक इतकाच आहे की दोन्ही संघाचे माजी खेळाडू आमनेसामने असतील.
टीम इंडिया-पाकिस्तानचे माजी दिग्गज भिडणार
वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेंड्स 2025 स्पर्धेला 18 जुलैपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील पहिला हंगाम 2024 साली खेळवण्यात आला होता. पहिल्या पर्वातील सलामीच्या सामन्यातही भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना खेळवण्यात आला होता. तर आताही दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. टीम इंडिया आणि पाकिस्तान क्रिकेट संघातील माजी खेळाडू पुन्हा एकदा आमनेसामने असणार आहेत. टीम इंडिया चॅम्पियन्सचा कॅप्टन म्हणून युवराज सिंह जबाबादारी पाहणार आहे. तर युनूस खान पाकिस्तान चॅम्पियन्सचं नेतृत्व करणार आहे.
सामना कुठे आणि कधी?
भारत-पाकिस्तान सामना एजबेस्टनमध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार या सामन्याला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. भारताकडून या सामन्यात ऑलराउंडर सुरेश रैना, फिरकीपटू हरभजन सिंह,मोहम्मद कैफ आणि इतर मातब्बर खेळाडू मैदानात उतरणार आहेत. तर पाकिस्तानकडून मिस्बाह उल हक, शाहिद आफ्रिदी, मोहम्मद आमिर आणि शोएब मलिक हे माजी दिग्गज खेळणार आहेत.
वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेंड्स 2025 स्पर्धेतील भारताचं वेळापत्रक
- विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स, 20 जुलै, एजबस्टन
- विरुद्ध दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स, 22 जुलै, नॉर्थम्पटन
- विरुद्ध ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स, 26 जुलै, लीड्स
- विरुद्ध इंग्लंड चॅम्पियन्स, 27 जुलै, लीड्स
- विरुद्ध वेस्टइंडिज चॅम्पियन्स, 29 जुलै, लीस्टरशायर
इंडिया चॅम्पियन्स : युवराज सिंह (कर्णधार), सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, मोहम्मद कैफ, इरफान पठान, पार्थिव पटेल, विनय कुमार, हरभजन सिंह, प्रज्ञान ओझा, यूसुफ पठान, नमन ओझा, मुनाफ पटेल, रतिंदर सिंह सोढी, आरपी सिंह आणि अशोक डिंडा.
पाकिस्तान चॅम्पियन्स : यूनिस खान (कॅप्टन), शाहिद अफ्रिदी शोएब मलिक, मिस्बाह-उल-हक, इमरान नजीर, मोहम्मद हफीज, कामरान अकमल, सलमान बट, अब्दुल रज्जाक, वहाब रियाज, मोहम्मद आमिर, यासिर अराफात, सोहेल तनवीर, सईद अजमल आणि उमर गुल.
