World Cup 2023 : श्रेयस अय्यरचा अनोख्या अंदाजात सन्मान, बेस्ट फिल्डरची घोषणा झाली आणि हवेतून उडत आलं मेडल
World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची अपेक्षेप्रमाणे कामगिरी झाली आहे. पाच पैकी पाच सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. या सामन्यात श्रेयस अय्यरने जबरदस्त झेल घेतला. यासाठी त्याचा अनोख्या पद्धतीने गौरव करण्यात आला.

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने अपेक्षित कामगिरी केली आहे. या सामन्यात अपेक्षेप्रमाणे खेळाडू कामगिरी करत आहेत. एखादा खेळाडू चालला नाही, तर दुसरा खेळाडू योग्य पद्धतीने भूमिका बजावत आहे. खासकरून टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षणात जबरदस्त फरक दिसून आला आहे. यासाठी प्रत्येक सामन्यानंतर बेस्ट फील्डर ऑफ द मॅच निवडला जातो. भारतीय टीम मॅनेजमेंटकडून श्रेयस अय्यर याच्या नावाची घोषणा करण्यात आली. श्रेयस अय्यर याने डेवॉन कॉनवे याचा स्क्वेअर लेगला जबरदस्त झेल घेतला. त्यामुळे सामन्यानंतर क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप याने त्याचा सन्मान केला. श्रेयस अय्यर याला बेस्ट फिल्डर हे मेडल अनोख्या अंदाजात घालण्यात आलं आहे. टी दिलीप यांनी अय्यर नावाची घोषणा ड्रेसिंग रुममध्ये केली आणि थेट खेळाडूंना घेऊन ग्राउंडमध्ये आले.
श्रेयस अय्यर याच्या गौरवासाठी गोल्ड मेडल थेट एअर कॅमच्या माध्यमातून आणण्यात आलं. यावर श्रेयस अय्यर याच्या फोटोसह मेडल आलं. मग काय रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव याने धाव घेत मेडल आणि फोटो हाती घेतला. तसेच श्रेयस अय्यरला घातलं. श्रेयस अय्यरने या सामन्यात दोन झेल घेतले. कॉनवे व्यतिरिक्त चॅपमॅन याचाही झेल घेतला. दुसरीकडे, फलंदाजीत श्रेयस अय्यरने 29 चेंडूत 33 धावा केल्या. यात त्याने 6 चौकार मारले.
Last time we revealed our "Best fielder winner" on the giant screen 🤙🏻
Our "Spidey sense" says this time we've taken it to new "heights" 🔝
Presenting the much awaited Dressing room Medal ceremony from Dharamshala 🏔️ – By @28anand#TeamIndia | #CWC23 | #MenInBlue | #INDvNZ
— BCCI (@BCCI) October 23, 2023
धर्मशाळेतील मैदानात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगतदार सामना झाला. भारताचे विकेट झटपट बाद झाल्याने दबाव वाढला होता. पण विराट कोहली आणि रवींद्र जडेजाने दबाव दूर करत विजय मिळवून दिला. असं असताना या सामन्यात भारतीय खेळाडूंनी तीन झेल सोडले हे देखील विसरून चालणार नाही. रवींद्र जडेजाने डेवॉन कॉनवेचा झेल सोडला होता. पण अय्यरने त्याची भरपाई केली.
वर्ल्डकपच्या प्रत्येक सामन्यानंतर टीम इंडियच्या बेस्ट फील्डरला एक मेडल दिलं जात आहे. हे मेडल फिल्डिंग कोच टी दिलीप टीम इंडियाला देतो. आयसीसीचं अधिकृत अवॉर्ड नाही. मात्र टीम इंडियात सकारात्मक वातावरण तयार व्हावं यासाठी गौरव करण्याची सुरुवात करण्यात आली आहे.
