WPL 2025, UPW vs RCB : युपी वॉरियर्सचं आरसीबीसमोर 226 धावांचं आव्हान, जॉर्जिया वोलचं शतक हुकलं
वुमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचा 18वा सामना युपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सुरु आहे. हा सामना आरसीबीचं स्पर्धेतील भवितव्य निश्चित करणार आहे. जर हा सामना आरसीबीने गमावला तर टॉप ३ मधील संघ निश्चित होणार आहेत.

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि युपी वॉरियर्स हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. युपी वॉरियर्स स्पर्धेतील शेवट गोड करण्याचा हेतूने मैदानात उतरला आहे. हेच लक्ष्य ठेवून ग्रेस हॅरिस आणि जॉर्जिया वोल या जोडीने आक्रमक सुरुवात केली. पहिलया विकेटसाठी दोघांनी ७७ धावांची भागीदारी केली. त्यानंतर किरण नवगिरने या भागीदारीला पुढे नेलं. किरण नवगिरने १६ चेंडूत ५ षटकार आणि २ चौकाराच्या मदतीने ४६ धावा केल्या. तिचं अर्धशतक अवघ्या ४ धावांनी हुकलं. त्यानंतर आलेली चिनले हेन्री काही खास करू शकली नाही. तिचा खेळ फक्त १९ धावांवर आटोपला. युपी वॉरियर्सने २० षटकात ५ गडी गमवून २२५ धावा केल्या. तसेच विजयासाठी २२६ धावा दिल्या आहे. या सामन्यात जॉर्जिया वोलचं शतक अवघ्या एका धावेने हुकलं. शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेताना दीप्ती शर्मा धावचीत झाली आणि या स्पर्धेतील पहिलं शतक होता होता राहिलं. जॉर्जियाने ५६ चेंडूत १७ चौकार आणि १ षटकार मारत नाबाद ९९ धावा केल्या.
आरसीबीकडून जॉर्जिया वारेहमने सर्वात चांगला स्पेल टाकला. तिने ४ षटकात ४३ धावा देत २ गडी बाद केले. या व्यतिरिक्त एकही गोलंदाज खास कामगिरी करू शकला नाही. आरसीबीने हा सामना गमावला तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. कारण आरसीबीला टॉप ३ मध्ये स्थान मिळवण्यासाठी दोन सामने जिंकणं भाग आहे. आता आरसीबीचे ४ गुण आहेत. तर मुंबई इंडियन्सचे ८ गुण आहेत. त्यामुळे नेट रनरेटच्या जोरावर टॉप ३ मध्ये स्थान मिळवण्याची शक्यता आहे. पण आज पराभव झाला तर हे गणित काही सुटणार नाही.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
यूपी वॉरियर्स महिला (प्लेइंग इलेव्हन): ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वॉल, किरण नवगिरे, दीप्ती शर्मा (कर्णधार), चिनेल हेन्री, श्वेता सेहरावत, पूनम खेमनार, उमा चेत्री (विकेटकीपर), सोफी एक्लेस्टोन, क्रांती गौड, अंजली सरवानी.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रघवी बिस्ट, रिचा घोष (विकेटकीपर), कनिका आहुजा, शार्लोट डीन, जॉर्जिया वेरेहम, किम गर्थ, स्नेह राणा, रेणुका सिंग ठाकूर.
