WPL 2025 : मुंबईचा टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय, गुजरातविरुद्ध दोघींचं पदार्पण, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
GGTW vs MIW Toss : मुंबईने गुजरातविरुद्ध टॉस जिंकून दुसऱ्या डावात बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईकडून भारतीय अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या संघातील 2 खेळाडूंचं पदार्पण झालं आहे.

वूमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेतील पाचव्या सामन्यात गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे बडोद्यातील कोतंबी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. मुंबईच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने बॉलिंगचा निर्णय घेत गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. आता मुंबईचे गोलंदाज गुजरातला किती धावांवर रोखतात? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
प्लेइंग ईलेव्हनमधून कोण?
गुजरातचा हा या हंगामातील तिसरा आणि मुंबईचा दुसरा सामना आहे. गुजरातने 2 पैकी 1 सामना जिंकलाय. तर मुंबईची पराभवाने सुरुवात झालीय. त्यामुळे मुंबईचा या सामन्यात जिंकून विजयाचं खातं उघडण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी टीम मॅनेजमेंटने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. साईका इशाक आणि जिंतामनी कलिता या दोघींना प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर केलं आहे. तर त्यांच्या जागी अंडर 19 वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेतील दोघींना पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.
पारुनिका सिसोदिया आणि जी कामिलिनी या दोघींचं पदार्पण झालं आहे. कामिलिनी हीने पदार्पणासह मोठा कारनामा केला आहे. कामिलिनी डब्ल्यूपीएलमध्ये पदार्पण करणारी सर्वात युवा खेळाडू ठरली आहे. कामिलिनीने वयाच्या 16 वर्ष 213 व्या दिवशी ही कामगिरी केली आहे. या दोघींनी नुकत्याच झालेल्या अंडर 19 वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. तर दुसऱ्या बाजूला गुजरातने एकही बदल केलेला नाही.
मुंबईचा दबदबा
दरम्यान मुंबई या स्पर्धेच्या इतिहासात गुजरातवर वरचढ राहिली आहे. उभयसंघात आतापर्यंत झालेल्या चारही सामन्यात मुंबईने विजय मिळवला आहे. त्यामुळे आता मुंबई हा सामना जिंकत पाचवा विजय मिळवणार की गुजरात पलटणची विजयी घोडदौड रोखणार? हे सामन्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.
गुजरात जायंट्स वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : ॲशले गार्डनर (कॅप्टन), लॉरा वोल्वार्ड, बेथ मुनी (विकेटरीपर), दयालन हेमलता, हर्लीन देओल, डिआंड्रा डॉटिन, सिमरन शेख, तनुजा कंवर, सायली सातघरे, काशवी गौतम आणि प्रिया मिश्रा.
मुंबई इंडियन्स वूमन्स प्लेइंग ईलेव्हन: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, कामिलिनी, अमेलिया केर, सजीवन सजना, अमनजोत कौर, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल आणि पारुनिका सिसोदिया.