
दिल्ली कॅपिट्ल्सने शनिवारी 24 जानेवारीला जेमिमाह रॉड्रिग्स हीच्या नेतृत्वात डब्ल्यूपीएल स्पर्धेतील चौथ्या मोसमातील 15 व्या सामन्यात आरसीबीला पराभूत केलं. दिल्लीने यासह आरसीबाचा विजयरथ रोखलं. आरसीबीचा हा या मोसमातील पहिलाच पराभव ठरला. दिल्लीने या विजयासह प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवलं. तसेच दिल्लीच्या या विजयामुळे प्लेऑफसाठीची चुरस आणखी वाढली आहे. दिल्लीने आरसीबीला पराभूत करत चौथ्या हंगामातील तिसरा विजय मिळवला. दिल्लीला या विजयामुळे पॉइंट्स टेबलमध्ये फायदा झाला आहे. दिल्लीने टॉप 2 मध्ये एन्ट्री घेत प्लेऑफसाठीचा दावा आणखी मजबूत केला आहे. दिल्ली पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. या चौथ्या मोसमातील 15 व्या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोण कितव्या स्थानी आहे? हे जाणून घेऊयात.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने स्मृती मंधानाच्या नेतृत्वात सलग 5 सामने जिंकत प्लेऑफचं तिकीट मिळवलं आहे. आरसीबी प्लेऑफमध्ये पोहचणारी पहिली टीम ठरली. त्यामुळे आरसीबी निश्चिंत आहे. तसेच आरसीबीने पराभवानंतरही पहिल्या स्थानी कायम आहे.
गुजरात जायंट्सने 3 सामने जिंकले आहेत. गुजरात 6 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र गुजरातच्या तुलनेत नेट रनरेट चांगला असल्याने दिल्ली पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे.
वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमातही प्लेऑफसाठी 5 पैकी 3 संघ पात्र ठरणार आहेत. त्यापैकी 1 संघ निश्चित झाला आहे. तसेच पॉइंट्स टेबलमधील पहिल्या स्थानी असलेला संघ थेट अंतिम फेरीत पोहचेल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असणाऱ्या संघात एलिमिनेटरचा थरार रंगणार आहे.
आरसीबीने प्लेऑफमध्ये धडक दिलीय. मात्र आरसीबीचा आता अव्वल स्थानी कायम राहून थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. तर इतर संघांचं प्लेऑफसाठीचं समीकरण काय आहे? हे जाणून घेऊयात.
साखळी फेरीत प्रत्येक संघ 8 सामने खेळणार आहे. आतापर्यंत एकूण 5 संघांनी प्रत्येकी 6-6 सामने खेळले आहेत. दिल्ली आणि गुजरातने 6 पैकी प्रत्येकी 3-3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांना 10 पॉइंट्स पर्यंत पोहचण्याची संधी आहे.
तर गतविजेता मुंबई इंडियन्स आणि यूपी दोन्ही संघांनी 6 पैकी प्रत्येकी 2 सामने जिंकलेत. त्यामुळे दोन्ही संघांचे उर्वरित सर्व सामने जिंकूनही 8 पेक्षा जास्त पॉइंट्स होणार नाहीत, हे स्पष्ट आहे. त्यामुळे या दोन्ही संघांना आपलं आव्हान कायम राखायचं असेल तर किमान उर्वरित सामने जिंकावे लागतील.
तसेच दिल्ली उर्वरित 2 सामन्यांत गुजरात आणि यूपी विरुद्ध भिडणार आहे. मात्र दिल्लीने एकही सामना गमावला तर त्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. दिल्लीचा पराभव झाल्यास सर्व काही नेट रनरेटनुसार ठरेल.
गुजरातचीही दिल्लीसारखीच स्थिती आहे. गुजरातचा दिल्ली विरुद्ध पराभव झाला तर मुंबईच्या प्लेऑफच्या आशा वाढतील. मात्र मुंबईला गुजरात विरूद्धच्या सामन्याआधी आरसीबीवर मात करावी लागेल.
तसेच यूपीसमोर उर्वरित 2 सामन्यांत आरसीबी आणि दिल्लीचं आव्हान आहे. गुजरातला आव्हान कायम राखण्यासाठी विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे आता एक पराभवामुळे कोणत्याही संघाचा टांगा पलटी होऊ शकतो.