SL vs BAN, 2nd Test: दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी श्रीलंकेचा नवा संघ जाहीर, स्टार खेळाडू बाहेर
श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना 25 जूनपासून सुरु होणार आहे. पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला होता. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी श्रीलंकेने संघात बदल केला आहे. कोणाची एन्ट्री झाली आणि का ते जाणून घ्या..

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 च्या चौथ्या पर्वात बांग्लादेश संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला. यामुळे यजमान श्रीलंकन संघाला मोठा धक्का बसला. आता वेगवानग गोलंदाज मिलन रत्नायके साइड स्ट्रेनमुळे दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकला आहे. मिलन रत्नायकेने पहिल्या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी केली होती. त्याने गॉल कसोटीत एकूण 4 गडी बाद केले होते. पहिल्या डावात 3, तर दुसऱ्या डावात एक गडी बाद केला होता. तसेच फलंदाजीतही कमाल केली होती. तर 39 धावा करत पहिल्या डावात कामिंदु मेंडिसह सातव्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली होती. आता त्याच्या जागी संघात डावखुरा वेगवान गोलंदाज विश्व फर्नांडोला घेतल आहे. दुसरीकडे, अँजेलो मॅथ्यूज पहिल्या कसोटीनंतर निवृत्त झाला आणि त्याची जागाही रिक्त झाली होती. त्यामुळे त्याच्या जागी 22 वर्षीय अष्टपैलू डुनिथ वेल्लालागे याला स्थान दिलं आहे. आता कोलंबोत श्रीलंकन संघ कोणत्या 11 खेळाडूंसह उतरणार याची उत्सुकता आहे.
पहिला कसोटी सामना ड्रॉ झाल्याने श्रीलंका आणि बांगलादेशची विजयी टक्केवारी ही 33.33 टक्के इतकी आहे. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने बाजी मारली तर विजयी टक्केवीरी 16 गुणांसह 66.67 टक्के होईल. तर बांगलादेशची विजयी टक्केवारी ही 4 गुणांसह 16.67 टक्के असेल. या उलट काही झालं तर बांगलादेशची विजयी टक्केवारी 66.67 टक्के आणि श्रीलंकेची विजयी टक्केवारी 16.67 टक्के होईल. हा सामना ड्रॉ झाला तर विजयी टक्केवारी ही दोन्ही संघांची 33.33 टक्के राहील.
दुसऱ्या कसोटीनंतर या वर्षभरात श्रीलंका कोणताही सामना खेळणार नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये श्रीलंका एकूण 12 सामने खेळणार आहे. त्यापैकी एक सामना झाला असून एक सामना 25 जूनपासून होणार आहे. त्यानंतर पुढच्या वर्षी श्रीलंकन संघ दोन कसोटी सामन्यासाठी वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. बांगलादेशविरुद्ध शेवटचा कसोटी सामना झाल्यानंतर श्रीलंकन संघ तीन वनडे आणि तीन टी20 सामने खेळणार आहे.
The Sri Lanka Cricket Selection Committee has named the below 19-member squad for the second test match.
The second test match will start on the 25th of June, 2025, at the SSC Ground, Colombo.#SLvBAN #WTC27 pic.twitter.com/oJNVNuFBMZ
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) June 23, 2025
दुसऱ्या टेस्ट सामन्यासाठी श्रीलंकन संघ : धनंजय डी सिल्वा (कर्णधार), पथुम निसांका, ओशादा फर्नांडो, लाहिरू उदारा, दिनेश चंडीमल, कामिंदु मेंडिस, कुसल मेंडिस, डुनिथ वेल्लालागे, पसिंदु सोरियाबंदरा, सोनल दिनुशा, पवन रत्ननायके, प्रभात जयसूर्या, थारिंडु रत्नायके, अकिला धनंजय, विश्वा फर्नांडो, असिथा फर्नांडो, कासुन राजिथा, इसिथा विजेसुंदरा
