SA vs AUS : मिचेल स्टार्कचं चिवट अर्धशतक, दक्षिण आफ्रिकेसमोर 282 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
South Africa vs Australia Wtc Final 2025 : दक्षिण आफ्रिकेला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये विजयासाठी ऑस्ट्रेलियाकडून 282 धावांचं आव्हान मिळालं आहे. मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025 अंतिम सामन्यातील तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 282 धावांचं आव्हान ठेवलं आहे. ऑस्ट्रेलियाकडे दुसऱ्या डावात 76 धावांची आघाडी होती. तर कांगारुंनी त्यानंतर दुसऱ्या डावात 65 षटकांमध्ये सर्वबाद 207 धावा केल्या. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने चिवट अर्धशतकी खेळी करुन ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. स्टार्कने केलेल्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला 280 पेक्षा अधिक धावांची आघाडी मिळवता आली. ऑस्ट्रेलियाचा डाव आटोपताच लंच ब्रेक जाहीर करण्यात आला. आता त्यानंतर दक्षिण आफ्रिकेची सलामी जोडी कशाप्रकारे सुरुवात करते? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
सामन्यात आतापर्यंत काय झालं?
दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ऑलआऊट 212 धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेकडे मोठी धावसंख्या करुन आघाडी घेण्याची संधी होती. मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी तसं होऊ दिलं नाही. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव हा अवघ्या 138 धावांवर आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 74 धावांची आघाडी मिळाली. दक्षिण आफ्रिकेसाठी डेव्हिड बेडिंगहॅम याने सर्वाधिक 45 धावा केल्या. तर कॅप्टन टेम्बा बावुमा याने 36 रन्स केल्या. तर इतरांना काही विशेष करता आलं नाही. ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार पॅट कमिन्स याने सर्वाधिक 6 विकेट्स मिळवल्या. तर मिचेल स्टार्क याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव
ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावानंतर एकूण आघाडी 281 धावांची झाली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर 282 धावांचं आव्हान आहे. मिचेल स्टार्क याने एलेक्स कॅरी याच्यासह आठव्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. नॅथन लायनसह नवव्या विकेटसाठी 14 धावा जोडल्या. तर दहाव्या विकेटसाठी स्टार्कने जोश हेझलवूडसह 135 बॉलमध्ये 59 रन्सची पार्टनरशीप केली. जोश हेझलवूड आऊट होताच ऑस्ट्रेलियाचा डाव आटोपला. हेझलवूडने 53 बॉलमध्ये 17 रन्स केल्या. तर स्टार्कने 136 बॉलमध्ये 5 फोरसह सर्वाधिक आणि नॉट आऊट 58 रन्स केल्या.
ऑस्ट्रेलियासाठी स्टार्क व्यतिरिक्त दुसऱ्या डावात मार्नस लबुशेन याने 22, स्टीव्हन स्मिथ 13, उस्मान ख्वाजा 6, ट्रेव्हिस हेड 9, ब्यू वेबस्टर 9 आणि कॅप्टन पॅट कमिन्स याने 6 धावा केल्या. कॅमरुन ग्रीन याला भोपळाही फोडता आला नाही. एलेक्स कॅरी याने 50 बॉलमध्ये 5 फोरसह 43 रन्स केल्या. नॅथन लायन याने 2 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी कगिसो रबाडा याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर लुंगी एन्गिडीने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर मार्को यान्सेन, लियान मल्डर आणि एडन मारक्रम या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
