यशस्वी जयस्वालने बेन डकेटला सतावलं, ओव्हल कसोटी दिलं थेट आव्हान
भारत इंग्लंड पाचवा कसोटी सामना रंगतदार वळणावर आला आहे. इंग्लंडला विजयासाठी 35 आणि भारताला 4 विकेटची गरज आहे. असं असताना या सामन्यात बेन डकेट आणि यशस्वी जयस्वालची तू तू मैं मैं पाहायला मिळाली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील पाचव्या सामन्याचा निकाल पाचव्या दिवसावर गेला आहे. चौथ्या दिवशीच्या अखेरीस पावसाने हजेरी लावली आणि सामना थांबवावा लागला. त्यामुळे सामन्याचा निकाल आता पाचव्या दिवशी लागणार आहे. इंग्लंडने दुसऱ्या डावात चांगली कामगिरी केली. पण शेवटच्या टप्प्यात झटपट विकेट गेल्याने संघ अडचणीत आला आहे. इंग्लंडला विजयासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. तर भारताला विजयासाठी 4 विकेटची गरज आहे. शेपटाचे फलंदाज असल्याने भारताला तितकीच संधी आहे. टीम इंडियाला सुरुवातीला बेन डकेटने त्रास दिला. त्यामुळे त्याची विकेट घेणं गरजेचं होतं. यासाठी यशस्वी जयस्वालने त्याला बाद करण्यासाठी एक युक्ती लढवली. झालंही तसंच.. कारण बेन डकेट त्याच्या जाळ्यात अडकला आणि तंबूत परतावं लागलं. जयस्वालने त्याला खुलं आव्हान दिलं होतं. पण त्याचं उत्तर काही डकेटकडे नव्हतं.
इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 17वं षटक खेळत होता. यात डकेट 38 धावांवर खेळत होता. जेव्हा जयस्वाल त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, ‘मी तुझ्या रिव्हर्स स्वीप पाहू इच्छितो. तू बचावात्मक का खेळत आहेत. मोठे फटके मार. असं खेळण्यात काही अर्थ नाही.’ डकेटने याचं उत्तर दिलं नाही. हळूहळू अर्धशतकापर्यंत पोहोचला. त्यानंतर मोठे फटके मारण्यास सरसावला. पण येथेच त्याने चूक केली आणि विकेट दिली. पण त्याने संघासाठी चांगली कामगिरी केली. इंग्लंडने 82 धावांवर दुसरी विकेट गमावली.
View this post on Instagram
दोन्ही खेळाडूंची कसोटीतील कामगिरी
यशस्वी जयस्वालने या कसोटी मालिकेतील पाच सामन्यात 41.10 च्या सरासरीने 411 धावा केल्या. यात दोन अर्धशतकं आणि दोन शतकांचा समावेश आहे. बेन डकेटने पाच सामन्यात 51.33 च्या सरासरीने 462 धावा केल्या. त्याने या मालिकेत 1 शतक आणि तीन अर्धशतकं ठोकली. दोन्ही खेळाडूंनी या मालिकेत चांगली कामगिरी केली. पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या डावातही डकेट मोठी धावसंख्या उभारू शकला असता. पण यशस्वी जयस्वालचं डिवचणं मनावर घेतलं आणि विकेट फेकली.
