Cricket: स्टार भारतीय ओपनरची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल केलं
भारतीय संघात ओपनर्स काही कमी नाही. पण प्रत्येकाला संधी मिळेलच असं नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसात क्रिकेट संघात बरीच उलथापालथ झाली आहे. त्यात डावखुऱ्या यशस्वी जयस्वालला टी20 संघात स्थान मिळणं कठीण झालं आहे. असं असताना एक बातमी समोर आली आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. दहाही फ्रेंचायझींनी आपल्या संघाची बांधणी केली असून आता स्पर्धेची प्रतीक्षा आहे. 26 मार्चपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दुसरीकडे भारताचा ओपनर यशस्वी जयस्वालला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. पुण्यात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील सामन्यानंतर यशस्वी जयस्वालची तब्येत बिघडली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं. रिपोर्टनुसार, राजस्थान आणि मुंबई सामन्यानंतर काही तासात यशस्वी जयस्वालच्या पोटात दुखू लागलं. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केलं गेलं. जयस्वालला सामन्यात फलंदाजी करत असतानाच पोटदुखीचा त्रास होत होता. सामन्यानंतर यात आणखी वाढ झाली. त्याला वेदना असह्य झाल्या आणि रुग्णालयात दाखल करावं लागलं. गॅस्ट्रोएन्टेरिटिसचा त्रास असल्याचे डॉक्टरांच्या तपासात निष्पन्न झालं आहे.
यशस्वी जयस्वालचंला रुग्णालयात दाखल करताच ड्रिपद्वारे औषधं देण्यात आली. त्यानंतर अल्ट्रासाउंड आणि सीटी स्कॅनदेखील करण्यात आलं. यशस्वी जयस्वाल संपूर्ण सामन्यात पोटदुखीच्या त्रासाने अस्वस्थ दिसला. सामन्यानंतर वाढत्या वेदनांमुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावं लागलं. बीसीसीआयने अद्याप त्याच्या प्रकृतीबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही. पण लवकरच अपडेट अपेक्षित आहे.सध्या औषधं सुरु असून त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. यशस्वी जयस्वाल सध्या भारताच्या टी20 संघाचा भाग नाही. तसेच येत्या काळात कोणतीही आंतरराष्ट्रीय मालिका होणार नाही. जानेवारीच्या मध्यात होणाऱ्या वनडे मालिकेसाठी त्याला पूर्ण बरा होण्याचा वेळ आहे. भारतीय संघ 11 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
आजारी असूनही यशस्वी जयस्वालने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात खेळला. या सामन्यात मुंबईने 217 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला. तसेच हा सामना 3 विकेट्सने जिंकला. या सामन्यात यशस्वी जयस्वालने 16 चेंडूत 15 धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे नाबाद 72 आणि सरफराज खानने 22 चेंडूत 73 धावांची खेळी केली. हा सामना जिंकला असला तरी मुंबईचं अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं आहे. मुंबईचे 8 गुण आहेत. पण नेट रनरेट कमी असल्याने हरियाणाने अंतिम फेरीत जागा मिळवली आहे. अंतिम फेरीत हरियाणा विरुद्ध झारखंड असा सामना होणार आहे.
