Ben Stokes : इंग्लंडचा विजय हिसकावला, बेन स्टोक्स जडेजा-सुंदरचं नाव घेत काय म्हणाला?
Ben Stokes Post Match Presentation Eng vs India 4th Test : इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने चौथ्या कसोटीत 5 विकेट्स घेण्यासह शतकही केलं. मात्र त्यानंतरही इंग्लंड मँचेस्टरमध्ये विजय मिळवू शकली नाही. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने द्विशतकी भागीदारी करत सामना बरोबरीत सोडवला.

इंग्लंडने मँचेस्टरमध्ये चौथ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 311 धावांची मोठी आघाडी घेतली. इंग्लंडने त्यानंतर भारताला दुसऱ्या डावातील पहिल्याच ओव्हरमध्ये 2 झटके दिले. त्यामुळे इंग्लंड सहज चौथा सामना जिंकून मालिका 3-1 ने नावावर करते, असं क्रिकेट चाहत्यांना वाटत होतं. मात्र केएल राहुल, शुबमन गिल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या चौघांनी चिवट खेळी केली आणि सामना बरोबरीत राखला. खरंतर इंग्लंड या सामन्यात मजबूत स्थितीत होती. इंग्लंडने हा सामना जिंकलेलाच. मात्र भारताने मुसंडी मारत इंग्लंडच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावला आणि सामना बरोबरीत राखला. इंग्लंडचा एकाप्रकारे हा पराभवच झाला, असंही सोशल मीडियावर म्हटलं जात आहे. या सामन्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स काय म्हणाला? हे जाणून घेऊयात.
टीम इंडियाची दुसऱ्या डावात वाईट सुरुवात
इंग्लंडच्या 311 धावांच्या प्रत्युत्तरात भारताचे 2 फलंदाज फ्लॉप ठरले. यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन हे दोघे आले तसेच परत गेले. त्यानंतर कर्णधार शुबमन गिल आणि केएल राहुल या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 188 धावांची भागीदारी केली. तर वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा ऑलराउंडर जोडीने पाचव्या विकेटसाठी नाबाद द्विशतकी भागीदारी केली. जडेजा आणि सुंदर जोडीने द्विशतकी भागीदारीदरम्यान इंग्लंडची आघाडी मोडीत काढली.
जडेजा आणि सुंदरची नाबाद द्विशतकी भागीदारी
जडेजा आणि सुंदर आणि दोघांनी पाचव्या विकेटसाठी नॉटआऊट 203 रन्सची पार्टनरशीप केली. या दरम्यान दोघांनीही वैयक्तिक शतक झळकावलं. भारताने 425 धावा केल्या आणि 114 रन्सची लीड मिळवली. मात्र तेव्हा मॅच ड्रॉ करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. इंग्लंडला सामन्यात मागे फेकण्यात जडेजा आणि सुंदरने निर्णायक आणि प्रमुख भूमिका बजावली. या सामन्यानंतर बेन स्टोक्स याने या दोघांचं नाव घेतलं.
स्टोक्स काय म्हणाला?
स्टोक्सने सुंदर आणि जडेजाचं कौतुक केलं. “त्या दोघांनी शानदार बॅटिंग करत भारताला पराभवापासून वाचवलं. वॉशिंग्टन-जडेजा ज्या पद्धतीने मैदानात आले आणि तिथे खेळले त्याचं तुम्हाला श्रेय द्यायला हवं“, असं स्टोक्सने म्हटलं.
