Rahul Dravid : राहुल द्रविडच्या कारचा अपघात, ऑटो चालकाशी वाद, Video व्हायरल
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका लोडिंग ऑटोची द्रविडच्या कारला टक्कर झाली. त्यानंतर द्रविडचा नवा अवतार पहायला मिळाला. संतापलेला द्रविड आणि ऑटो चालकामध्ये काही काळ वादही झाला. त्या दोघांचा व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय.

जून 2024 मध्ये भारतीय संघाला टी-20 वर्ल्डकप जिंकून दिल्यानंतर राहुल द्रविड प्रचंड चर्चेत आला होता, मात्र गेल्या काही काळापासून तो लो प्रोफाईल होता. अनेक दिवसांपासून तो कुठे फारसा दिसला नाही. मात्र माजी भारतीय खेळाडू आणि कोच राहुल द्रविड हा पुन्हा चर्चेत आला आहे. त्याच्याशी निगडीत एक मोठी बातमी समोर आली आहे. राहुल द्रविडच्या कारची एका लोडिंग ऑटोशी धडक झाली आणि त्यानंतर संतापलेल्या द्रविडचा ऑटो चालकाशी थोडा वादही झाला. त्या दोघांच्या भांडणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला असून त्यामुळ द्रविड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि कोच असलेल्या राहुल द्रविडचा हा व्हिडीओ बंगळुरू येथील असल्याचे समजते. तेथील कनिंगहम रोडवर ही घटना घडली , ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. सुदैवाची बाब म्हणजे ही किरकोळ टक्कर असून यात कोणालाही दुखापत झाली नाही. पण ही टक्कर झाल्यानंतर राहुल द्रविड आणि ऑटो चालक यांच्यात जोरदार वाद झाला, त्यांच्या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला.
द्रविडच्या एसयूव्ही कारला मागून धडक
ही घटना मंगळवारी (४ फेब्रुवारी) घडली. संध्याकाळी 6.30 च्या सुमारास राहुल द्रविड हा इंडियन एक्स्प्रेस सर्कलहून हाय ग्राऊंडकडे कारने जात होता तेव्हाच ही घटना घडली. लोडिंग ऑटोने द्रविडच्या कारला मागून धडक दिली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, टक्कर झाल्यानंतर राहुल द्रविड कारमधून खाली उतरून पाहणी करत असल्याचे दिसून आलं. त्यानंतर राहुल द्रविड आणि ऑटो चालक यांच्यात काही काळ बाचाबाची देखील झाली. त्याच्या कारला मागून डेंट आलाय, असं द्रविड ऑटोलाचालकाला सांगताना दिसला. मात्र, याप्रकरणी अद्याप पोलिसांत कोणतीही तक्रार आलेली नाही.
Rahul Dravid’s Car touches a goods auto on Cunningham Road Bengaluru #RahulDravid #Bangalore pic.twitter.com/AH7eA1nc4g
— Spandan Kaniyar ಸ್ಪಂದನ್ ಕಣಿಯಾರ್ (@kaniyar_spandan) February 4, 2025
द्रविडने घेतला ऑटो ड्रायव्हरचा नंबर
याप्रकरणी एका पोलिसा अधिकाऱ्याने माहिती दिली. ” ही एक छोटीशी घटना होती, जी त्या जागेवरच सोडवता आली असती. सध्यातरी आम्हाला याप्रकरणी कोणतीही तक्रार मिळालेली नाही. ” व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये राहुल द्रविड हा थोडा निराश झाल्याचे दिसत होते, त्याने त्या ऑटो चालकाला कन्नड भाषेत काहीतरी सांगितलंही. द्रविडने आपल्या कारच्या नुकसानीचा आढावा घेतला आणि ड्रायव्हरला याबद्दल माहिती दिली. तेथून निघताना द्रविडने ऑटोचालकाकडून त्याचा फोन नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर घेतल्याचेही वृत्त आहे.