T20 World Cup : हार्दिक पंड्या टीम इंडियामध्ये नंबर-1, जसप्रीत बुमराहलाही टाकलं पिछाडीवर !
T20 वर्ल्डकप 2024 सुरू होण्याआधी, हार्दिक पांड्याच्या फॉर्मवर सर्वाधिक प्रश्न उपस्थित केले जात होते. कारण त्याआधी आयपीएल 2024 मध्ये पंड्याची गोलंदाजी आणि फलंदाजीमधील कामगिरी अत्यंत खराब होती. मात्र या वर्ल्डकपमध्ये पंड्या आपल्या फलंदाजीने चमत्कार करू शकला नसला तरी गोलंदाजीत त्याने आपली ताकद चांगलीच दाखवली आहे.

T20 वर्ल्डकप 2024मध्ये टीम इंडियाने अतिशय जबरदस्त कामगिरी केली आहे. आणि कोणत्याही अडथळ्यांशिवाय दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडियाच्या या दमदार खेळाचे मुख्य कारण म्हणजे संघातील घातक गोलंदाज असून, त्यामुळे प्रत्येक संघ हैराण झाला आहे. जसप्रीत बुमराह या गोलंदाजीचा स्टार असल्याचे सिद्ध झाला आहे. त्याच्या भन्नाट चेंडूंना कोणत्याही संघाच्या फलंदाजांकडे उत्तर नसते. बुमराहच्या या सुरेख खएळीला अष्टपैलू हार्दिक पांड्याचीही चांगलीच साथ मिळाल्याचं दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विकेट्स टिपण्या व्यतिरिक्त पांड्या हा ‘डॉट बॉल्स’च्या बाबतीतही सध्या आघाडीवर आहे.
हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ग्रुप स्टेजनंतर हेच खरं आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आयपीएल 2024 हार्दिक पांड्याच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. बॅटिंगमध्ये तो अपयशी ठरत होता आणि त्याच्या बॉलिंगचीही समोरचे फलंदाज धुव्वा उडवत होते. त्यामुळे T20 वर्ल्डकप 2024मध्येही त्याचा असाच फॉर्म असेल की काही सुधारणा होऊ शकेल, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र टीम इंडियाच्या 3 मॅचनंतर हार्दिकने सर्वांना चुकीचं ठरवल्याचं स्पष्ट झालं.
विकेट आणि डॉट बॉल्समध्ये आघाडीवर
ग्रुप स्टेजच्या प्रत्येक सामन्यात हार्दिकनेटीम इंडियाला यश मिळवून दिले. पहिल्या सामन्यात त्याने 27 धावांत 3 बळी घेतले होते. त्यानंतर त्याने पाकिस्तानविरुद्ध 24 धावांत 2 बळी आणि अमेरिकेविरुद्ध 14 धावांत 2 बळी घेतले. अशा प्रकारे, त्याने 3 सामन्यात 7 विकेट घेतल्या आहेत, जे सध्याच्या स्पर्धेत टीम इंडियासाठी सर्वाधिक बळी आहेत. तर जसप्रीत बुमराहने 3 सामन्यात 5 विकेट घेतल्या आहेत.
मात्र विकेट्सपेक्षाही धक्कादायक ही डॉट बॉल्सची आकडेवारी आहे. डॉट बॉल म्हणजे ज्या चेंडूंवर एकही धाव काढली जात नाही. हार्दिक पांड्याने एकूण 12 षटके टाकली, ज्यात त्याने 5.41 च्या सरासरीने 65 धावा दिल्या आहेत. या 12 षटकांत हार्दिकने 44 चेंडूत एकही धाव काढू दिली नाही. तर बुमराहने 11 षटकात 4.09 च्या इकॉनॉमीसह केवळ 45 धावा दिल्या आहेत. त्याच्या 66 चेंडूंपैकी 42 धावा झाल्या नाहीत.
मात्र या आकडेवारीचा अर्थ असा नाही की हार्दिक अधिक प्रभावी ठरला आहे किंवा बुमराहच्या गोलंदाजीला ती धार नाही. उलट, हे आकडे दर्शवतात की बुमराहच्या वेगवान गोलंदाजीला हार्दिककडूनही चांगली साथ मिळाली आहे. त्याच्या फॉर्मबाबत प्रश्न उपस्थित होत होते, मात्र त्याने चांगली कामगिरी करून दाखवली.
