Mohammed Siraj : आयुष्यात यश कसं मिळवायचं? सिराजने त्यामागचा जो विचार, प्रोसेस सांगितली ती एकदा वाचा, नक्कीच होईल फायदा
Mohammed Siraj : भविष्याचा विचार करत नाही, म्हणून आईने त्याची कानउघडणी केलेली. त्यावर त्याने त्याच्या आईला एक उत्तर दिलेलं. 'एक दिवस असा येईल, जेव्हा तुझ्याकडे पैसे घरात ठेवायला जागा नसेल'

मानवी संघर्ष, मेहनत आणि यश क्रीडा विश्वात अशा असंख्य स्टोरीज आहेत. क्रिकेट यापेक्षा वेगळं नाही. बलिदान, समर्पण आणि प्रतिकुल परिस्थितीशी झगडून सर्वोच्च स्तरावर मिळालेलं यश अशा अनेक स्टोरीज तुम्हला क्रीडा विश्वात पहायला, वाचायला आणि ऐकायला मिळतील. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची स्टोरी सुद्धा अशीच आहे. ऑटोरिक्षाचालकाच्या घरात त्याचा जन्म झाला. आर्थिक परिस्थिती बेताची होती. सिराज बराचवेळ क्रिकेट खेळण्यात घालवायचा. त्यामुळे त्याची आई वैतागायची. कारण आई म्हणून तिला सिराजच्या भविष्याची चिंता होती.
द इंडियन एक्सप्रेसच्या द आयडीया एक्सचेंज कार्यक्रमात मोहम्मद सिराजला अशाच एका घटनेबद्दल विचारण्यात आलं. भविष्याचा विचार करत नाही, म्हणून आईने त्याची कानउघडणी केलेली. त्यावर त्याने त्याच्या आईला एक उत्तर दिलेलं. ‘एक दिवस असा येईल, जेव्हा तुझ्याकडे पैसे घरात ठेवायला जागा नसेल’
मला तो दिवस अजूनही आठवतो
“मला तो दिवस अजूनही आठवतो, जेव्हा आई मला ओरडत होती. नेहमीप्रमाणे मी क्रिकेट खेळायचो. माझ्या आईला ते नाही आवडायचं. ती म्हणायची, तुला तुझ्या भविष्याची काळजी नाही. त्यावेळी मी तिला बोललो, माझ्यावर ओरडू नकोस. एकदिवस मी इतका पैसा कमवीन की, तो पैसा ठेवायला घरात जागा नसेल. मी तिला बोललो, तू काळजी करु नको, मी करुन दाखवेन” असं मोहम्मद सिराज त्या आठवणींबद्दल बोलताना म्हणाला.
तुम्ही त्यासाठी स्वत:ला ट्रेन केलं पाहिजे
“त्या दिवशी मी जे बोललो, ते देवाने मान्य केलं. तु्म्हाला सर्वोच्च स्तरावरच क्रिकेट खेळायचं असेल, तर आत्मविश्वास महत्वाचा आहे. तो आत्मविश्वास तुमच्यात नसेल, तर तुम्ही काही करु शकत नाही. तुम्ही विश्वास बाळगलात तरच तुम्ही तुमच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकता. तुम्ही जर बोललात मी यॉर्कर चेंडू टाकेन आणि विकेट काढीन, तर तुम्हाला नक्की यश मिळेल. तुम्ही तुमच्या मनात विचार करताय की, मी असा चेंडू टाकला तर मला विकेट मिळेल, तर तुम्हाला ती योजना अमलात आणण्यासाठी काही प्रमाणात आत्मविश्वास मिळेल. तुम्ही त्यासाठी स्वत:ला ट्रेन केलं पाहिजे. तुम्ही कठोर मेहनत केली, तर तुम्ही मॅचमध्ये ते अमलात आणू शकता” असं मोहम्मद सिराज या कार्यक्रमात म्हणाला.
