IND vs ENG: टीम इंडियाची चिंता वाढली, इंग्लंडचा ‘हा’ खेळाडू भारतीय गोलंदाजांना फोडणार घाम
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका २० जूनपासून सुरु होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात युवा खेळाडूंचा समावेश असणार आहे. या मालिकेत एक खेळाडू भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरु शकतो.

भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात २० जूनपासून कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघात नवख्या खेळाडूंचा समावेश आहे. तसेच संघाचे नेतृत्वही युवा शुभमन गिलच्या हातात देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा एक स्टार खेळाडू सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी हा दौरा आव्हानात्मक असणार आहे. हा खेळाडू कोण आहे ते जाणून घेऊयात.
जो रूट भारतीय गोलंदाजांना घाम फोडणार
टीम इंडियासाठी या मालिकेत इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट धोकादायक ठरू शकतो. जो रूट कसोटी सामन्यांमध्ये अद्भुत कामगिरी करत आहे. जेव्हा जेव्हा भारत आणि इंग्लंडचे संघ कसोटी सामन्यांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत तेव्हा जो रूटने शानदार कामगिरी केलेली आहे. त्याने आतापर्यंत भारतीय संघाविरुद्ध ३० कसोटी सामन्यांमध्ये १० शतके झळकावली आहेत, जी सर्वाधिक आहेत. आता आगामी मालिकेतही तो भारतीय गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
रूटने सचिन-द्रविडलाही टाकले मागे
जो रूटने भारताविरुद्धच्या ३० कसोटी सामन्यांच्या ५५ डावात २८४६ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ५८.०८ आहे.यात त्याने १० शतकी खेळी केल्या आहेत. दोन्ही संघांमधील मालिकेत सर्वाधिक शकत झळकावण्याचा विक्रम रुटच्या नावावर आहे. या यादीत राहुल द्रविड दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने सात शतके ठोकली आहेत. तसेच सचिन तेंडुलकरच्या नावावरही सात शतके आहेत. राहुल द्रविडने २०११ मध्ये आणि सचिनने २०१२ मध्ये कसोटीतून निवृत्ती घेतलेली आहे. मात्र २०१२ मध्ये कसोटी पदार्पण करणारा जो रूट अजूनही खेळत आहे, त्याने सचिनचे अनेक विक्रम मोडले आहेत.
जो रूट सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये
जो रूटची शानदार फॉर्ममध्ये आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत त्याने दुसऱ्या सामन्यात १६६ धावांची नाबाद खेळी केली होती, तसेत पहिल्या सामन्यात त्याने ५७ धावा आणि तिसऱ्या सामन्यात ४४ धावा केल्या आहेत. तसेच झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटीत त्याने ३४ धावा केल्या होत्या. सध्या जो रूट जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याने ही भारतीय संघासाठी धोक्याची घंटा आहे.
कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 20 ते 24 जून, हेडिंग्ले, लीड्स
दूसरा सामना, 2-6 जुलै, बर्मिंगघम,
तिसरा सामना, 10-14 जुलै, लॉर्ड्स.
चौथा सामना: 23-27 जुलै, मँचेस्टर.
पाचवा सामना: 31 जुलै ते 4 ऑगस्ट, केनिंग्टन ओव्हल.
