IND vs WI : वेस्ट इंडिज विरुद्ध 351 धावा करुन पण हरलो, त्याला प्रामुख्याने भारताचा हा एक प्लेयर जास्त जबाबदार
IND vs WI : भारत-वेस्ट इंडिजमध्ये काल चंदीगड येथे तिसरा वनडे सामना झाला. या सामन्यात वेस्ट इंडिजने विजय मिळवल्यामुळे भारताचं मालिकेत क्लीनस्वीप करण्याचं स्वप्न भंगलं. भारताच्या नावावर 2-1 अशा मालिका विजयाची नोंद झाली. भारताच्या या पराभवाला एक खेळाडू प्रामुख्याने जबाबदार आहे.

वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे मालिकेत क्लीन स्वीप करण्याचं भारताचं स्वप्न अपूर्ण राहिलं. पहिल्या दोन वनडेत दमदार विजय मिळवल्यानंतर तिसऱ्या वनडेतही सहज जिंकू असं वाटलेलं. खासकरुन पहिली फलंदाजी करताना स्कोरबोर्डवरील धावा पाहून असचं वाटलेलं. धावफलकावर थोड्या थोड्क्या नव्हे तब्बल 351 धावा होत्या. वेस्ट इंडिजला इतक्या अवघड लक्ष्याचा पाठलाग करणं जमणार नाही असचं वाटलेलं. पण कॅप्टन शे होपच्या 143 चेंडूतील 162 धावांच्या विक्रमी खेळीच्या बळावर वेस्ट इंडिजने अवघड वाटणारं हे लक्ष्य साध्य करुन दाखवलं. वेस्ट इंडिजने शेवटचा सामना जिंकल्यामुळे भारताला मालिकेवर निर्विवाद वर्चस्व गाजवता आलं नाही. भारताच्या नावावर 2-1 अशा मालिका विजयाची नोंद झाली.
कर्णधार शुबमन गिलच्या मते या पराभवासाठी खराब फिल्डिंग आणि डेथ ओव्हर्समधील गोलंदाजी जबाबदार आहे. वर्ल्ड कप आधी ज्या फिल्डिंगची अपेक्षा आहे, तशी फिल्डिंग भारतीय टीमने केली नाही. भारताने 6-7 कॅच सोडल्या. इतक्या संधी सोडणं कुठल्या टीमसाठी चिंतेचा विषय आहे असं शुबमन गिलने म्हटलं. ही सर्व कारणं जरी असली तरी अंशुल कंबोजची गोलंदाजी हे सुद्धा भारताच्या पराभवासाठी एक कारण आहे. त्याने 9 ओव्हर्समध्ये 82 धावा दिल्या. पण त्याला एकही विकेट काढता आली नाही. त्याने 9.11 च्या सरासरीने धावा दिल्या. हेड कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन शुबमन गिल अंशुलचा वनडे वर्ल्ड कपसाठी विचार करत असतील, तर निश्चितच हा आकडा चिंता वाढवणारा आहे.
तर आज निकाल 3-0 भारताच्या बाजूने असता
रोहित शर्माच्या 85 चेंडूतील 92 धावा, केएल राहुलच्या 87 चेंडूतील 129 रन्स आणि ऋतुराज गायकवाडच्या 57 धावा यांच्या फलंदाजीच्या बळावर भारताने 50 ओव्हर्समध्ये 7 विकेट गमावून 351 धावा केल्या. पहिल्या षटकापासून वेस्ट इंडिजचा डाव दबावाखाली राहिल अशी ही स्थिती होती. पण भारतीय गोलंदाजाच्या खराब प्रदर्शनामुळे वेस्ट इंडिजला 352 हे टारगेट चेज करता आलं. अंशुल कंबोजने कमीत कमी दोन ओव्हर चांगल्या टाकल्या असत्या तर आज निकाल 3-0 भारताच्या बाजूने असता. वेस्ट इंडिजने 10 चेंडू राखून विजय मिळवला. म्हणजे भारतीय गोलंदाजांनी दोन ओव्हर चांगल्या टाकल्या असत्या तर निकाल भारताच्या बाजूने फिरला असता.
