Madhuri Dixit: माधुरी दीक्षितसमोर चाहत्याचा भन्नाट जल्लोष; ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ जिंकताच ब्लेझर काढून डान्स
Madhuri Dixit: ‘कोण होणार करोडपती’चा हा नवा प्रवास येत्या 12 ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता सोनी मराठी आणि सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर वर पाहता येणार आहे.

Madhuri Dixit: ‘कोण होणार करोडपती’ या लोकप्रिय क्विझ शोच्या नव्या पर्वाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. यंदाच्या पर्वात अभिनेत्री माधुरी दीक्षित सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार असून, तिच्या खास अंदाजाची झलक दाखवणारे अनेक क्षण सध्या चर्चेत आहेत. अशाच एका व्हिडीओमध्ये जळगावचे शरद राजपूत यांचा उत्साह पाहायला मिळाला. विशेष म्हणजे शरद हे माधुरी दीक्षितचे मोठे चाहते असून त्यांच्या लाडक्या अभिनेत्रीसमोर हॉट सीटवर बसण्याची संधी त्यांच्यासाठी एखाद्या स्वप्नपूर्तीसारखीच ठरली. शरद यांच्या टी-शर्टवर चक्क माधुरी दीक्षितचा फोटो पाहायला मिळाला. त्यामुळे सेटवर माधुरी आणि तिच्या चाहत्याची ही भेट आणखी खास ठरली. ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ फेरीत शरद यांनी बाजी मारताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी लगेच आपला ब्लेझर काढला आणि सेटवरच भन्नाट डान्स करत विजयाचा जल्लोष केला. त्यांच्या या उत्स्फूर्त सेलिब्रेशनने उपस्थितांमध्येही हशा पिकला.
शरद यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि माधुरींबद्दलचं त्यांचं प्रेम या क्षणी स्पष्टपणे दिसून आलं होतं. अनेक वर्षांपासून ज्या अभिनेत्रीला पडद्यावर पाहिलं, तिच्यासमोर प्रत्यक्ष बसून प्रश्नांची उत्तरं देण्याची संधी मिळणं, हा अनुभव त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला. त्यांच्या टी-शर्टवरील माधुरींच्या फोटोमुळेही हा क्षण विशेष चर्चेत आला आहे.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
या भागातील आणखी एक मजेशीर प्रसंग म्हणजे माधुरीने शरद यांना त्यांच्या पत्नीबद्दल विचारलेला प्रश्न. पत्नीविषयी बोलताना शरद मिश्किलपणे म्हणाले, “ती माझं सगळं ऐकते.” शरद यांचं उत्तर ऐकल्यानंतर माधुरीनेही लगेच तिच्या खास विनोदी अंदाजात विचारलं, “ती फक्त ऐकते की कधीकधी ऐकवते देखील?” माधुरीच्या या प्रश्नावर सेटवर एकच हशा पिकला. त्यांच्या सहज आणि मिश्किल संवादामुळे शोमधील वातावरण आणखी रंगतदार झाल्याचं पाहायला मिळालं.
‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वात माधुरी दीक्षितची सूत्रसंचालक म्हणून नवी भूमिका प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा विषय ठरली आहे. आतापर्यंत अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या माधुरी आता स्पर्धकांशी मनमोकळ्या गप्पा मारताना आणि त्यांच्या आयुष्यातील खास गोष्टी जाणून घेताना दिसणार आहे. त्यामुळे ज्ञान, मनोरंजन आणि भावनिक क्षणांचा सुंदर मेळ या पर्वात पाहायला मिळणार आहे.
