शेवटच्या ओव्हरमध्ये धोनीचा षटकार, भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय

अॅडिलेड: कर्णधार विराट कोहलीचं खणखणीत शतक आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या संयमी अर्धशतकाच्या जोरावर, भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्स राखून पराभव केला.  या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 299 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान 49.2 षटकात 4 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केलं. कोहलीने जबरदस्त खेळी करत 112 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह …

शेवटच्या ओव्हरमध्ये धोनीचा षटकार, भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय

अॅडिलेड: कर्णधार विराट कोहलीचं खणखणीत शतक आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या संयमी अर्धशतकाच्या जोरावर, भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्स राखून पराभव केला.  या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 299 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान 49.2 षटकात 4 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केलं. कोहलीने जबरदस्त खेळी करत 112 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह 105 धावा केल्या. कोहलीचं हे कारकिर्दीतील 39 वं शतक ठरलं. तर धोनीने नाबाद 55 धावांची खेळी करुन, या विजयात कोहलीसह मोलाचा वाटा उचलला.

शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी 6 चेंडूत 7 धावांची गरज होती. फलंदाजीसाठी धोनी मैदानात होता. बेहेरेनड्रॉफच्या पहिल्याच चेंडूवर धोनीने षटकार ठोकला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर 1 धाव घेत, धोनीने विजयी तोरण बांधलं. दरम्यान या विजयामुळे भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने शॉन मार्शची शतकी (131) खेळी आणि ग्लेन मॅक्सवेलच्या धडाकेबाज 48 धावा यामुळे 50 षटकात 9 बाद 298 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाचं 299 धावांचं लक्ष्य घेऊन भारताचे सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा मैदानात उतरले. या दोघांनी आश्वासक सुरुवात करत 47 धावांची सलामी दिली. शिखर धवन 28 चेंडूत 32 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर रोहित शर्माने कर्णधार कोहलीच्या साथीने धावफलक हलता ठेवला. रोहित अर्धशतक पूर्ण करेल असं वाटत होतं, मात्र 43 धावांवर त्याला स्टोईनिसने हॅण्डस्कोम्बकरवी झेलबाद केलं. रोहितने 2 षटकार आणि 2 चौकार ठोकले.

रोहित बाद झाल्यावर अंबाती रायडू फलंदाजीला आला. मात्र रायडूला या वन डेतही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रायुडू 24 धावा करुन माघारी परतला. यानंतर आलेल्या धोनीने कर्णधार कोहलीला उत्तम साथ दिली. धोनीच्या साथीने कोहलीने शतक पूर्ण केलं. त्यानंतर फटकेबाजीचा प्रयत्न करत असताना, कोहली रिचर्डसनचा शिकार ठरला. मॅक्सवेलने त्याला झेलबाद केलं.

मग धोनीच्या साथीला दिनेश कार्तिक आला. या दोघांनी आधी चेंडू आणि धावा यांतील अंतर कमी केलं आणि त्यानंतर भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. धोनीने 54 चेंडूत नाबाद 55 तर दिनेश कार्तिकने 14 चेंडूत नाबाद 25 धावा केल्या.

त्याआधी शॉन मार्शची शतकी (131) खेळी आणि ग्लेन मॅक्सवेलच्या धडाकेबाज 48 धावांमुळे ऑस्ट्रेलियाला 298 अशी मोठी धावसंख्या उभारली. पण शेवटच्या शतकांमध्ये मॅक्सवेल आणि मार्शला बाद केल्यामुळे भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला वेळेतच वेसन घातली.

भारताकडून भुवनेश्वर कुमारने 45 धावा देऊन 4, मोहम्मद शमीने 58 धावांच्या बदल्यात 3, तर रवींद्र जाडेजाने एक विकेट घेतली. कुलदीप यादव आणि आंतरराष्ट्रीय पदार्पण करत असेलल्या मोहम्मद सिराजला एकही विकेट मिळाली नाही. मोहम्मद सिराजने 10 षटकात सर्वाधिक 76, तर कुलदीपने 66 धावा दिल्या.

संबंधित बातम्या

AUSvsIND : भारतासमोर विजयासाठी तब्बल 299 धावांचं आव्हान

मोहम्मद सिराजची 43 वर्षांपूर्वीच्या लाजिरवाण्या विक्रमाशी बरोबरी 

विराट कोहलीचं शतक, सर्वाधिक शतकांच्या यादीत पहिले 5 कोण?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *