IPL 2020: सूर्यकुमारच्या शानदार खेळीनंतर रवी शास्त्रींचं ट्विट, संतप्त चाहत्यांचा शास्त्रींवर हल्लाबोल

आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. परंतु टीम इंडियामध्ये सूर्यकुमारला संधी देण्यात आलेली नाही.

IPL 2020: सूर्यकुमारच्या शानदार खेळीनंतर रवी शास्त्रींचं ट्विट, संतप्त चाहत्यांचा शास्त्रींवर हल्लाबोल

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (India tour of Australia) टीम इंडियाची (Team India) घोषणा झाल्यापासून सातत्याने एक प्रश्न विचारला जातोय, या संघात मुंबईच्या सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) निवड का झाली नाही? गेल्या तीन-चार वर्षांपासून रणजी आणि आयपीएलमध्ये (IPL) सातत्यपूर्ण कामगिरी करुनही सूर्यकुमारकडे बीसीसीआयची निवड समिती दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे अनेक माजी क्रिकेटर, क्रीडा समीक्षक आणि क्रिकेटरसिकांनी बीसीसीआयच्या निवड समितीवर नाराजी व्यक्त केली आहे.

निवड समितीने मंगळवारी टीम इंडियाची घोषणा केली, त्यानंतर काल (बुधवारी) आयपीएलमध्ये खेळवण्यात आलेल्या. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमधील सामन्यात सूर्यकुमारने आपल्या खेळीद्वारे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) तडाखेदार खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह मुंबईने प्ले ऑफमध्ये धडक मारली आहे. बंगळुरुने मुंबईला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान मुंबईने 5 विकेट्स गमावून 5 चेंडूआधी पूर्ण केलं. मुंबईने 19.1 ओव्हरमध्ये 166-5 धावा केल्या. सूर्यकुमार यादव मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. सूर्यकुमारने 43 चेंडूत नाबाद 79 धावांची शानदार खेळी केली. यानंतर पुन्हा एकदा सूर्यकुमारच्या टीम इंडियामधील निवडीबाबत चर्चेला सुरुवात झाली आहे.

सूर्यकुमारची शानदार खेळी पाहून टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी सूरयकुमारला एक संदेश दिला आहे. रवी शास्त्रींनी सूर्यकमारचा कालच्या सामन्यातील एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे, त्यांनी म्हटले आहे की, ‘सूर्य नमस्कार, मजबूत राहा आणि धैर्य ठेव’

शास्त्रींच्या ट्विटनंतर चाहते संतापले

शास्त्री यांच्या ट्विटनंतर अनके क्रीडारसिक संतापले आहेत. अनेकांनी शास्त्रींना ट्विटरच्या माध्यमातून वेगवेगळे सवाल केले आहेत. सूर्यकुमारची टीम इंडियात निवड का झाली नाही? त्याच्याकडे बीसीसीआयचं दुर्लक्ष का होतंय? तुम्ही आज त्याचं कौतुक करताय, पण संघनिवड करत असताना तुम्ही कुठे होता?

सूर्यकुमारचा आयपीएलमध्ये दबदबा

सूर्यकुमार यादवने यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळताना 12 सामन्यांमध्ये 40.22 च्या सरासरीने 362 धावा फटकावल्या आहेत. यादरम्यान त्याने 48 चौकार आणि 8 षटकार ठोकले आहेत. या धावा त्याने 155.36 च्या स्ट्राईक रेटने जमवल्या आहेत. नाबाद 79 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. आयपीएलच्या मागील मोसमात सूर्यकुमारने 16 सामन्यांमध्ये 424 धावा फटकावल्या होत्या. 2018 च्या आयपीएलमध्ये त्याने 14 सामन्यांमध्ये 512 धावा फटकावल्या होत्या.

देशांतर्गत क्रिकेटमध्येही सूर्य तळपला

30 वर्षीय सूर्यकुमार यादवने देशांतर्गत क्रिकेटमध्येदेखील (Domestic cricket) उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. 77 प्रथम श्रेणी सामन्यांमद्ये त्याने 44 पेक्षा जास्त सरासरीने 5326 धावा फटकावल्या आहेत. यात 14 शतकं आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे. 93 लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने 35.46 च्या सरासरीने 2447 धावा फटकावल्या आहेत. यात 2 शतकं आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवचा जलवा पाहायला मिळाला आहे. 156 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 31.81 च्या सरासरीने आणि 140 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 3245 धावा फटकावल्या आहेत.

संबंधित बातम्या

Australia Tour : सूर्यकुमारकडे निवड समितीचं पुन्हा दुर्लक्ष; हरभजन-मनोज तिवारी BCCI वर संतापले

IPL 2020 : हिटमॅन मैदानावर परतला; ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड होण्याची शक्यता

India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हिटमॅन’ संघाबाहेर

(IPL 2020 : Team India coach Ravi Shastri tweets message for Suryakumar yadav, fans got angry)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI